कलाकार नसते तर आपल्या देशात अराजकता माजली असती – राज ठाकरे

राज ठाकरे यांच्या हस्ते अभिनेते अशोक सराफ यांचा जाहीर सन्मान

पुणे : आपण जेवढ्या प्रतिमा जपल्या तेवढ्या प्रतिभा जपल्या नाहीत. परदेशांत गेल्याशिवाय आपल्याला आपल्या कलाकारांचे महत्त्व उमगत नाही. आज अशोक सराफ (Ashok Saraf) जर युरोपातील कलाकार असते तर, त्यांचा सत्कार तिथल्या पंतप्रधानांच्या हस्तेच झाला असता. परदेशात कलाकारांच्या नावाने मोठमोठ्या वास्तू उभ्या राहतात, विमानतळे होतात आणि आपल्याकडे साधे चौक असतात. ही सारी कलाकार मंडळी आहेत म्हणून आपण त्यांच्यामध्ये गुंतून पडलो, वाईट गोष्टींकडे आपलं दुर्लक्ष झालं अन्यथा आपल्या देशात अराजकता माजली असती असे परखड मत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी व्यक्त केले.

रावेतकर ग्रुप व अभिव्यक्ती संस्थेच्या वतीने ‘अशोकपर्व’ या महोत्सवाच्या शेवटच्या दिवशी राज ठाकरे यांच्या हस्ते आणि रसिक प्रेक्षकांच्या वतीने अशोक सराफ यांचा जाहीर नागरी सन्मान करण्यात आला त्यावेळी ठाकरे बोलत होते. कोथरूड येथील यशवंतराव चव्हाण नाट्यगृह या ठिकाणी सदर कार्यक्रम संपन्न झाला. सुप्रसिद्ध अभिनेते अशोक सराफ यांच्या नाट्य व चित्रपटसृष्टीतील कारकीर्दीला यंदा ५० वर्षे व त्यांनी वयाची ७५ वर्षे पूर्ण केल्याचे औचित्य साधत त्यांचा अभिनय क्षेत्रातील प्रवास उलगडणाऱ्या अशा या ‘अशोक पर्व’ महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते.

अशोक सराफ यांच्या पत्नी निवेदिता सराफ, अभिनेते प्रशांत दामले, रावेतकर समूहाचे संचालक अमोल रावेतकर, अभिव्यक्तीचे राजेश दामले आदी मान्यवर या वेळी उपस्थित होते.

अशोक सराफ यांनी राज ठाकरे हे माझे आवडते राजकारणी असल्याचे सांगितल्यावर ज्या व्यक्तीला मी लहानपणा पासून पाहत मोठा झालो त्याने माझा उल्लेख आवडता म्हणून केला यातच मी भरून पावलो असे सांगत राज ठाकरे म्हणाले, “ अशोक सराफ हे एकमेव असे अभिनेते आहेत ज्यांना प्रेक्षक म्हणून समोर कोणीही असलं तरी फरक पडत नाही. त्यांचा स्वत:चा नाटकावर एक वेगळा ‘इम्पॅक्ट’ असतो. हा प्रभाव गेली ५०-६० वर्षे कायम असून ही बाब साधीसुधी नाही.”

केवळ विनोदी कलाकार म्हणून त्यांच्यावर शिक्का मारणे चुकीचे आहे कारण चित्रपटात आज झालेल्या विनोदावर प्रेक्षक त्यानंतर दीड दोन वर्षांनी हसत असतो हे लक्षात घेण्यासारखे आहे, असेही ठाकरे यांनी नमूद केले.  हा दागिना सराफांच्या घरीच मिळू शकतो अशी मिश्कील टिप्पणी देखील राज ठाकरे यांनी केली.

अशोक सराफ जर दक्षिणेत असते तर आज मुख्यमंत्री असते, इतकेच नाही तर त्यांचा ४०-४० फुटांचा कटलाऊट लावून त्याचा दुग्धाभिषेक केला गेला असता. आपल्याकडे हा फक्त चांगला कलाकार आहे यावर भागवलं जातं असेही ठाकरे यांनी नमूद केले.

सराफ यांचा जन्म बेळगावचा असल्याने आता तुम्हीच सीमाप्रश्न सोडवा अशी मिश्कील विनंती राज ठाकरे यांनी त्यांना केली. तर मोठ्या माणसांचे सत्कार करायला आता तेवढीच मोठी माणसं राहिली नसल्याची खंत देखील त्यांनी मांडली.

सत्काराला उत्तर देताना अशोक सराफ म्हणाले, “जे काम येत गेलं ते मी प्रामाणिकपणे करत गेलो. ते लोकांना आवडले ही माझ्या दृष्टीने मोठी गोष्ट आहे. आणि म्हणूनच रसिक प्रेक्षकांचे हे ऋण माझ्यावर आहेत असे मी मानतो. आज माझा हा सन्मान राज ठाकरे या व्यक्तीच्या हस्ते झाला याचाही मला आनंद आहे.” अशोक सराफ हा चांगला कलाकार तर आहेच शिवाय चांगला मुलगा, भाऊ, पिता, जावई आणि चांगला माणूस आहे. अशा व्यक्तीची मी पत्नी आहे याचा मला अभिमान आहे अशा भावना निवेदिता सराफ यांनी व्यक्त केल्या.

महोत्सवाच्या आजच्या शेवटच्या दिवसाच्या पहिल्या सत्रात प्रशांत दामले यांनी अशोक सराफ यांची मुलाखत देखील घेतली. त्यावेळी बोलताना सराफ म्हणाले, “मराठी नाटकं टिकवून ठेवायची असतील तर सातत्याने चांगलंच दाखवायला हवं. यामुळे प्रेक्षक नाटकाला येईल. पण तोच प्रेक्षक कायम येत रहावा यासाठी इमाने इतबारे प्रयत्न देखील व्हायला हवेत. आत्मसुखासाठी नाटक करणं ही वेगळी गोष्ट आहे, पण कोणतीही कलाकृती सादर करताना प्रेक्षकांचा विचार हा व्हायलाच हवा.”

मी जेव्हापासून काम करतोय तेव्हापासून मराठी रसिक प्रेक्षकांना कथेमध्येच रस आहे. तुम्ही त्यांना लंडन, पॅरीस दाखविण्याच्या नादात कथेशी तडजोड करू नका. कारण त्यांना कथा आवडली तरच तो चित्रपट यशस्वी होणार आहे असे सांगत सराफ पुढे म्हणाले की, “नाटक ही कलाकाराला मिळालेली देणगी आहे कारण प्रत्येक नव्या प्रयोगात काहीतरी नवं सादर करायची संधी ते तुम्हाला देतं. कांही जण उपजत कलाकार असतात मात्र प्रशांत दामले सारखे लोक बघून बघून शिकत जातात आणि उत्कृष्ट कलाकार म्हणून नावाजले जातात. ‘गेला माधव कुणीकडे’ हे नाटक करणं मला शक्य नव्हतं म्हणून मी नाही म्हणालो. त्या नाटकाला नाही म्हणण ही माझी चूक असली तरी त्या नाटकाचं सोनं प्रशांतने केलं आणि एक सर्वोत्तम कलाकार रंगभूमीला मिळाला अशा शब्दांत अशोक सराफ यांनी प्रशांत दामले यांचे कौतुक केले.

अमोल रावेतकर यांनी कार्यक्रमाच्या सुरुवातीला सर्वांचे स्वागत करून मनोगत व्यक्त केले तर राजेश दामले यांनी सूत्रसंचालन केले.