राज ठाकरे देवेंद्र फडणवीसांच्या जवळचे असल्याने मनसे कार्यकर्त्यांना कायद्याचा धाक नाही – NCP

नाशिक : मनसे नेते अमित ठाकरे (MNS leader Amit Thackeray) हे सध्या नाशिक आणि नगरच्या दौऱ्यावर आहेत. काल रात्री अमित ठाकरे यांना सिन्नर येथील टोल नाक्यावर अर्धा तास तिष्ठत उभं राहावं लागलं. अमित ठाकरे यांचाहा अपमान सहन न झाल्याने मनसैनिकांनी टोलनाकाच फोडला.

मिळालेल्या माहितीनुसार, महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष अमित ठाकरे हे २२ जुलै रोजी संध्याकाळी अहमदनगर येथून सिन्नर कडे येत होते. समृद्धी महामार्गावरून येत असताना सिन्नर येथील समृद्धी महामार्गाच्या टोलनाक्यावर अमित ठाकरे यांचा ताफा अडवून त्यांना अर्धा तास थांबवून ओळख देऊनही संबंधित कर्मचाऱ्यांनी त्यांना अपमानास्पद वागणूक दिल्याचा आरोप मनसेने केला.

दरम्यान, या घडामोडींवर आता राष्ट्रवादीकडून प्रतिक्रिया आली असून तोडफोड करणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी राष्ट्रवादीचे प्रवक्ते क्लाईड क्रास्टो यांनी केली आहे. ते म्हणाले, समृद्धी महामार्ग येथील टोल प्लाझाची तोडफोड करणाऱ्या मनसे कार्यकर्त्यांना कायद्याचा धाक नसल्याचे दिसून येते.त्यांचे नेते राज ठाकरे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अगदी जवळचे आहेत असे त्यांना वाटत असावे म्हणून त्यांना कायद्याची भीती वाटत नाही का? त्यांच गैरसमज दूर करण्यासाठी फडणवीस यांनी कठोर कारवाई करावी.अशी मागणी त्यांनी केला आहे.