बोंबला! चोरट्यांनी बोलेरोसह लाखोंचे टोमॅटो चोरले; शेतकऱ्यांना सतर्क राहण्याचे पोलिसांचे आवाहन

Tomato Theft: टोमॅटोच्या किमती देशभरात विक्रमी पातळीवर पोहोचल्या आहेत. देशातील बहुतांश राज्यांमध्ये टोमॅटोचे दर 100 ते 150 रुपये आहेत. अशा स्थितीत टोमॅटो चोरीच्या घटना समोर येत आहेत. आता टोमॅटो चोरीचे आणखी एक प्रकरण समोर आले आहे. यावेळी शेतकऱ्याच्या वाहनासह चोरट्यांनी दोन लाख रुपये किमतीचे टोमॅटो चोरून नेले. ही घटना शनिवारी बंगळुरूमध्ये घडली.

मिळालेल्या माहितीनुसार शेतकऱ्याच्या गाडीचा चुकून एका कारसोबत छोटा अपघात झाला. दरम्यान,यातून किरकोळ अपघाताचे रुपांतर हाणामारीत झाले. यानंतर चोरट्यांनी चालक व शेतकऱ्याला बळजबरीने निर्जनस्थळी नेले. शेतकरी व चालकाला तेथेच सोडून ते कारसह पळून गेले.

चित्रदुर्ग जिल्ह्यातील हिरीयुर येथून हा शेतकरी महिंद्रा बोलेरो जीपमधून कोलार मार्केटमध्ये टोमॅटो घेऊन जात होता. यावेळी ही चोरीची घटना घडली. बेंगळुरू शहरातील एपीएमसी यार्ड पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडली. टोमॅटोची किंमत अंदाजे दोन लाख रुपये आहे. पोलिस अधिकाऱ्याने माहिती दिली की, मारामारीदरम्यान त्याने कारच्या नुकसानभरपाईसाठी 10 हजार रुपयांची मागणी केली. वाद वाढल्यानंतर त्याला निर्जनस्थळी नेले आणि तेथेच सोडून तेथून पळ काढला.

हिंदुस्तान टाईम्सच्या वृत्तानुसार, एफआयआर नोंदवल्यानंतर पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. भारतीय दंड संहिता (IPC) च्या कलम 379 (चोरी) आणि 390 (डाकडा) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. त्याचबरोबर पोलिसांनी संपूर्ण राज्यातील शेतकऱ्यांना सतर्क राहण्यास सांगितले आहे.