मोदी सरकार २०२२ चीच आश्वासने पूर्ण करु शकले नाही; मग २०२३ मध्ये नवीन जुमल्यांची अपेक्षा करावी का?

मुंबई  – २०२२ हे वर्ष संपले तरी मोदी सरकार दिलेली आश्वासने पूर्ण करण्यात अपयशी ठरले आहे त्यामुळे आता २०२३ मध्ये नवीन जुमल्यांची अपेक्षा देशांनी ठेवावी का? अशी जोरदार टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्य मुख्य प्रवक्ते महेश तपासे यांनी केली आहे. २०२२ हे वर्ष संपायला काही तास शिल्लक आहेत. या वर्षात मोदींच्या भाजप सरकारने देशातील जनतेला काही आश्वासने दिली होती. याची आठवण महेश तपासे यांनी करुन दिली आहे.

देशाचा जीडीपी १० टक्केपर्यंत जाईल असे मोदी सरकार म्हणाले होते मात्र तो जीडीपी आजही ६.५ टक्क्यांवर आहे. देशातील सर्व नागरिकांना स्वतः चे हक्काचे घर मिळेल सांगितले मात्र तशी परिस्थिती आज नाही. कास्तकर्‍यांचे, शेतकर्‍यांचे आर्थिक उत्पन्न दुप्पट होईल असे आश्वासन दिले होते. कुपोषण संपेल. या देशातील गुंतवणूकीचा दर ३६ टक्क्यांपर्यंत जाईल असे सांगितले मात्र तसेही घडले नाही. यासह अनेक आश्वासने मोदी सरकारने दिली त्याचे काय झाले असा प्रश्न जनता करत आहे.

मोदी सरकारचे लक्ष फक्त निवडणूका हेच आहे जी आश्वासने देतात ती पूर्णत्वाकडे नेण्याकडे नसतो असा आरोपही महेश तपासे यांनी केला आहे. मोदी सरकारने सर्व ग्रामपंचायतींमध्ये १०० टक्के ब्रॉडबँड कनेक्टिव्हिटी सोबत सर्वांसाठी डिजिटल साक्षरता आणि ५ ट्रिलियनची अर्थव्यवस्था करण्याचा हेही दावे केले होते.

८ वर्षांच्या भाजप राजवटीत केंद्रसरकारचे कर्ज ८० लाख कोटी रुपयांवर पोहोचले आहे, यूएस डॉलर ८२ रुपयांच्या पुढे वाढला आहे आणि चालू खात्यातील तूट वाढली आहे. तर जवळपास दोन लाख भारतीयांनी त्यांचे नागरिकत्व सोडले आणि इतरत्र स्थलांतर केले आहे असेही महेश तपासे म्हणाले. विकास आणि कर्जाची परतफेड करण्यासाठी सरकारकडे खरोखरच रोडमॅप आहे की २०२३ मध्ये देशाने नवीन जुमल्यांची अपेक्षा करावी? असा थेट सवालही महेश तपासे यांनी केला आहे.