मला महाराष्ट्राचा विरोधी पक्षनेता बनवा, काँग्रेस आमदाराचे थेट मल्लिकार्जुन खर्गे यांना पत्र

पुणे – महाराष्ट्रातील अलीकडच्या राजकीय घडामोडींनंतर विधानसभेतील विरोधी पक्षनेतेपद रिक्त झाले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर काँग्रेस आता विधानसभेत प्रमुख विरोधी पक्ष बनला आहे. या सर्व राजकीय घडामोडींमध्ये पुणे जिल्ह्यातील भोर मतदारसंघातील काँग्रेसचे आमदार संग्राम थोपटे (Sangram Thopate) यांनी आता अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे (Mallikarjun Kharge) यांना पत्र लिहून विरोधी पक्षनेतेपदासाठी आपल्या नावाचा विचार करण्याची विनंती केली आहे.

सोमवारपासून महाराष्ट्र राज्य विधानसभेचे पावसाळी अधिवेशन सुरू होत असताना थोपटे यांनी हे पत्र लिहिले आहे. थोपटे यांनी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे (एमपीसीसी) अध्यक्ष नाना पटोले यांना नाही तर एआयसीसी नेतृत्वाला पत्र लिहिले आहे. थोपटे यांनी खर्गे यांना लिहिलेल्या पत्रात नमूद केले आहे की, मागील एमव्हीए सरकारमध्ये त्यांच्या नावाला सभापतीपदासाठी मान्यता देण्यात आली होती, परंतु अजित पवारांनी तेव्हा त्याला विरोध केला होता.

थोपटे यांनी लिहिले, ‘आता अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेससोबत नाहीत. पश्‍चिम महाराष्ट्र पुणे जिल्ह्याचे राजकारण लक्षात घेऊन या संधीचा फायदा घेऊन पुणे जिल्ह्यातील व पश्चिम महाराष्ट्रातील कामगिरी सुधारण्यासाठी प्रबळ विरोधी पक्ष म्हणून काँग्रेस पक्षाचे नाव पुढे आणू शकेन. काँग्रेस नेतृत्वाला भाजपशी लढायचे असेल आणि पुणे आणि पश्चिम महाराष्ट्राचे प्रश्न सोडवायचे असतील तर त्यांचा अनुभव उपयोगी पडू शकतो, असे थोपटे म्हणाले. आज तक ने याबाबत वृत्त दिले आहे.