आशिया चषकाची ही कसली तयारी? बांगलादेशचा क्रिकेटपटू चक्क जळत्या निखाऱ्यावर चालतोय

Mohammad Naim Viral Video: कोणताही क्रिकेटपटू मेगा टूर्नामेंटची तयारी कशी करतो? जर तो फलंदाज असेल तर तो त्याच्या फलंदाजीवर काम करेल. गोलंदाज असेल तर गोलंदाजीवर. अष्टपैलू खेळाडू असल्यास तो फलंदाजी आणि गोलंदाजी या दोन्हींवर काम करतो. तसेच क्रिकेटपटू क्षेत्ररक्षणावरही भर देतो. पण एक क्रिकेटर जळत्या निखाऱ्यावर चालत आशिया कपसाठी तयारी करत आहे.

आशिया कप 2023 दोन आठवड्यांपेक्षा कमी कालावधीत सुरू होणार आहे. या मेगा टूर्नामेंटसाठी सर्व आशियाई संघ जोरदार तयारी करत आहेत. आशिया चषक स्पर्धेतील सर्व सहभागी संघांना 2023 च्या एकदिवसीय विश्वचषकापूर्वी आत्मपरीक्षण करण्याची उत्तम संधी आहे. त्याचबरोबर बांगलादेश क्रिकेट संघानेही आशिया चषकासाठी आपला संघ जाहीर केला आहे. त्यात स्टार सलामीवीर मोहम्मद नईमचाही (Mohammad Naim) समावेश आहे.

नईम सध्या खूप चर्चेत आहे. मोहम्मद नईमचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये नईम जळत्या निखाऱ्यावर चालताना दिसत आहे. हे पाहून सर्वांनाच आश्चर्य वाटले.

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये बांगलादेशचा सलामीवीर मोहम्मद नईम कसा निखाऱ्यांवर चालतोय हे स्पष्टपणे दिसत आहे. आशिया चषकापूर्वी नईम माइंड ट्रेनिंग करत आहे आणि फायर वॉकिंग हा त्याच्या ट्रेनिंगचा एक भाग असल्याचं म्हटलं जातं. हा व्हायरल व्हिडिओ पाहून काही चाहते त्याच्यावर टीकाही करत आहेत.