“ब्राह्मण समाजात शिवाजी, संभाजी नावं ठेवत नाहीत”; छगन भुजबळांचा संभाजी भिडेंवर हल्लाबोल

भारताचा राष्ट्रध्वज तिरंगा झेंडा आणि राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्ये केल्याने शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे यांच्यावर टीकेची भडिमार झाली. आता ऐतिहासिक घटनांबाबत वारंवार वादग्रस्त विधानं करणारे संभाजी भिडे (Sambhaji Bhide) यांच्यावर मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी टीका केली आहे. ब्राह्मण समाजात शिवाजी, संभाजी अशी नावं ठेवत नाहीत, अशा शब्दांत भुजबळांनी त्यांच्यावर निशाणा साधला आहे.

नाशिकमध्ये मराठा विद्या प्रसारक मंडळाच्या ‘समाज दिन’ कार्यक्रमात भुजबळ बोलत होते. ते म्हणाले, “काही लोक म्हणतात तुम्ही इकडे तिकडे गेलात. पण आम्ही कुठेही गेलो तरी शाहू-फुले-आंबेडकरांचा वारसा सोडणार नाही. संभाजी भिडेंचं खरं नाव मनोहर कुलकर्णी आहे. पण लोकांमध्ये संभ्रम निर्माण करण्यासाठी खरंतर ब्राह्मण समाजानं वाईट वाटून घेण्याचं कारण नाही. पण कुठल्याही ब्राह्मण घरामध्ये कोणीही शिवाजी, संभाजी नाव ठेवत नाहीत. हा माणुस उठूनसुठून कुणावरही टीका करत असतो. त्यामुळं इतिहास मोडणाऱ्यांविरोधात आपल्याला उभं राहावं लागेल.” अशा शब्दांत छगन भुजबळ यांनी संभाजी भिडेंवर टीकास्त्र सोडलंय.