‘धनुष्यबाण हे चिन्ह गोठवण्याच्या निवडणूक आयोगाच्या निर्णयाला उद्धव ठाकरे हेच जबाबदार’

मुंबई – शिवसेनेचे ‘धनुष्य-बाण’ हे निवडणूक चिन्ह(sign) गोठवण्याचा हंगामी आदेश केंद्रीय निवडणूक आयोगाने शनिवारी रात्री उशिरा जारी केला.आयोगाचा हा निर्णय ठाकरे गटासाठी धक्कादायक असून त्याविरोधात न्यायालयात दाद मागितली जाण्याची शक्यता आहे. न्यायालयाच्या या निर्णयामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ माजली आहे. कालपासून विविध नेत्यांच्या प्रतिक्रियाही समोर येत आहेत.

दरम्यान, धनुष्यबाण हे चिन्ह गोठवण्याच्या निवडणूक आयोगाच्या निर्णयाला उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray)हेच जबाबदार असल्याचा आरोप राज्याचे शालेय शिक्षणमंत्री आणि शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर (Deepak Kesarkar) यांनी केला. निवडणूक आयोगाचा अंतरिम आदेश आम्ही मान्य केला आहे. मात्र, खऱ्या अर्थाने धनुष्यबाण चिन्हावर आमचाच अधिकार आहे. आमच्याबरोबर आमदार, खासदार जिल्हाप्रमुख, नगरसेवक आहेत. आम्ही आयोगापुढे वेळेवर कागदपत्रे दाखल केली, मात्र ठाकरे गटानं प्रत्येकवेळी तारखा मागितल्या. कागदपत्रं वेळेत सादर केली नाहीत. त्यामुळे आता निवडणूक आयोगाने चिन्ह गोठवलं; तर आम्हालाच जबाबदार धरायचं, हा केवळ सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न आहे, असंही केसरकर म्हणाले.