मिंधे गटाचा हेतू हा शिवसेनेला संपवण्याचा आहे, पण मी कुठेही डगमगलो नाही – ठाकरे 

मुंबई – शिवसेनेचे ‘धनुष्यबाण’ हे निवडणूक चिन्ह गोठवण्याचा हंगामी निर्णय निवडणूक आयोगाने शनिवारी घेतला. तसेच, या दोन्ही गटांना ‘शिवसेना’ हे नावही वापरता येणार नाही. आयोगाच्या या निर्णयानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दूरदृष्यप्रणालीव्दारे जनतेशी संवाद साधला आहे. यावेळी ठाकरे यांनी आपल्या भावनांना मोकळी वाट करून दिली.

ते म्हणाले,  आपल्याशी काही जणांनी गद्दारी केली. मुख्यमंत्रीपदी ज्यांना पाहिजे होते, त्यांनी ते घेतले. ज्यांना सर्वकाही दिले, तेही गेले. आपण काय बोललो नाही. मात्र, आता मात्र अति होत आहे. शिवसेना प्रमुख व्हायला निघाले आहेत, अशा शब्दांत उद्धव ठाकरेंनी शिंदे गटावर हल्लाबोल केला आहे.
मिंधे गटाचा हेतू हा शिवसेनेला संपवण्याचा आहे, पण मी कुठेही डगमगलो नाही. कारण माझा न्यायदेवतेवर विश्वास आहे असं उद्धव ठाकरे म्हणाले. काही कारस्थानी लोकांनी बाळासाहेबांचे हिंदुत्व गोठवलं असल्याचा आरोप उद्धव ठाकरे यांनी शिंदे गटावर केला आहे. निष्ठा ही विकत घेता येत नाही हे परवाच्या मेळाव्यावरुन स्पष्ट झालं असंही ते म्हणाले.

काल निवडणूक आयोगाने आपल्याला आदेश दिल्यानंतर आपण तात्काळ निवडणूक आयोगाला तीन चिन्हे दिली आहेत. यामध्ये एक त्रिशूळ आहे. दुसरं उगवता सूर्य आणि तिसरा धगधगती मशाल. तीन नावं सुद्धा आपण तात्पुरत्या वेळासाठी निवडणूक आयोगाला दिली आहेत. त्यातील पहिलं नाव हे शिवसेना बाळासाहेब ठाकरे, शिवसेना बाळासाहेब प्रबोधनकार ठाकरे, तिसरं उद्धव बाळासाहेब ठाकरे आहे.

निवडणूक आयोग म्हटल्यानंतर नि:पक्षपातीपणा आठवतं. कारण तुम्ही लोकशाहीचे रक्षणकर्ते आहात. आपण म्हटल्याप्रमाणे नावं आणि चिन्हं सादर केली आहेत. अंधेरीची पोटनिवडणूक आहे. आम्हाला लवकरात लवकर यातील एक चिन्ह आणि एक नाव द्या. मी निवडणूक आयोगाला धन्यवाद देतो कारण शिवसेनेने काय चिन्हे आणि नाले दिली आहेत ते जनतेला सांगितलं आहे. पण समोरच्यांनी काय दिलंय ते सांगितलेलं नाही. याचाच अर्थ त्यांनी अजूनही काही सादर केलेलं नाही.