कुणाला पंतप्रधान बनायचे तर कुणाला मुख्यमंत्री बनायचे आहे त्यांना माझ्या शुभेच्छा – शरद पवार

दिल्ली   – २०२४ मध्ये महाराष्ट्रातील सत्ता बदलेल असा विश्वास व्यक्त करतानाच ज्यांच्या हातात सत्ता आहे त्या लोकांना दुर करून विरोधकांच्या विरोधात ज्याप्रकारची पावले उचलली गेली त्याची किंमत त्यांना चुकवावी लागेल असा स्पष्ट इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार (NCP National President Sharad Pawar) यांनी पत्रकार परिषदेत दिला.

ज्या लोकांनी जनतेला कमिटमेंट करुन त्यांचे मतदान घेऊन चुकीच्या रस्त्यावर गेले त्यांना किंमत द्यावीच लागेल. राजकीय स्थिती बदलेल तेव्हा राष्ट्रवादी काँग्रेस, कॉंग्रेस आणि उध्दव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना यांच्या हातात महाराष्ट्रातील जनता सत्ता देईल असा जबरदस्त विश्वासही शरद पवार यांनी व्यक्त केला.

पार्टीला संपवण्याचा प्रयत्न काही लोकांनी केला. आता पक्षाला मजबूतीने उभे करणे आणि चांगल्या स्थितीत आणणे ही मानसिकता आमच्या सर्व लोकांची होती. आजची बैठक आमची उमेद वाढवायला महत्त्वाची आहे असेही शरद पवार यांनी स्पष्ट केले.

कुणी काय म्हटले हे मला माहीत नाही. एक गोष्ट नक्की आहे की, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा मी अध्यक्ष आहे. दुसर्‍या कुणी स्टेटमेंट दिली त्यात कोणतेही तथ्य नाही असा टोलाही शरद पवार यांनी अजित पवार यांचे नाव न घेता लगावला.

आजची वर्कींग कमिटीची बैठक संविधानाला धरून होती. त्यामुळे कुणी काही म्हटले असेल तर त्यात कोणतीही खरी गोष्ट नाही.सुप्रीम कोर्टाचा जो निवाडा आला आहे त्यात विधीमंडळ सदस्यांची संख्या हा मेजर इश्यू नाही. मात्र कुणाला पंतप्रधान बनायचे तर कुणाला मुख्यमंत्री बनायचे आहे त्यांना माझ्या शुभेच्छा आहेत अशा शब्दात शरद पवार यांनी खिल्ली उडवली.

आमचा विश्वास निवडणूक आयोगावर आहे. आम्हाला जे काही सांगायचे आहे ते निवडणूक आयोगाला सांगणार आहे. मात्र त्यांनी दखल घेतली नाही तर दुसऱ्या यंत्रणेकडे जाण्याचा विचार करु मात्र ही वेळ आमच्यावर येईल असे मला वाटत नाही. आम्हाला पूर्ण विश्वास आहे की निवडणूक आयोग योग्य तो निर्णय घेईल असेही शरद पवार म्हणाले.

जिथे लोकांचे समर्थन आहे तिथे काय स्थिती असते हे मी पाहिले आहे आणि ज्याप्रकारे महाराष्ट्रात युवकांचे समर्थन मिळत आहे ते पहाता मला त्याचा आनंद आहे असेही शरद पवार म्हणाले.

आज भाजपचे केंद्रसरकार विरोधकांवर दबाव टाकण्यासाठी ईडी, सीबीआय व इतर यंत्रणांचा वापर जागोजागी करत आहे. ठिक आहे अकरा महिने निवडणूकीला आहेत त्यानंतर देशातील स्थिती बदलेल त्यावेळी त्यामध्ये काय सुधारणा करण्याची आवश्यकता आहे ही आमची टॉप प्राथमिकता असेल असेही शरद पवार यांनी पत्रकांरानी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना स्पष्ट केले.दरम्यान या राष्ट्रीय वर्कींग कमिटीच्या बैठकीत प्रफुल पटेल, सुनिल तटकरे आणि कोहली यांना वर्कींग कमिटीतून निलंबित करण्याचा ठराव आज करण्यात आला.