मी व माझ्या कुटुंबियांचा कोणत्याही भ्रष्ट, चुकीच्या व्यवहारात सहभाग नाही – सोमय्या

मुंबई – शिवसेना खासदार संजय राऊत (MP Sanjay Raut Press) यांनी आज पत्रकार परिषद घेऊन केंद्रातील आणि राज्यातील भाजपवर हल्लाबोल (Raut Criticized BJP) केला आहे. केंद्रीय तपास यंत्रणांचा दबाव आणून आम्हाला अडकवण्याचा प्रयत्न केला जात आहे. माझ्याविरोधातील सर्व प्रकरणे खोटी असल्याचा दावा संजय राऊत यांनी यावेळी केला.

दरम्यान, राऊत यांच्या पत्रकार परिषदेत अनेक गौप्यस्फोट होतील अशी आशा तमाम मराठी जनतेला होती मात्र या पत्रकार परिषदेत करण्यात आलेले आरोप पाहिल्यानंतर आता भाजप नेते राऊत यांची खिल्ली उडवत टीका करू लागले आहेत. २०१७ मध्ये संजय राऊत संपादक असलेल्या सामना ने माझ्या पत्नीच्या नावाने असेच आरोप केले होते. आज त्याच बांधकाम व्यावसायिकाचे नाव घेऊन माझ्या मुलावर आरोप केले जात आहेत. या आरोपाबाबत ठाकरे सरकारने माझी जरूर चौकशी करावी, असे आव्हान भाजपा नेते डॉ. किरीट सोमय्या यांनी दिले आहे.

डॉ. सोमय्या यांनी म्हटले आहे की , ठाकरे सरकारने माझ्याविरुद्ध आतापर्यंत १० गुन्हे दाखल केले आहेत, आणखी ३ दाखल होण्याच्या प्रतीक्षेत आहेत. आता आणखी एका चौकशीस मी तयार आहे. खुशाल चौकशी करा. मी व माझ्या कुटुंबियांचा कोणत्याही भ्रष्ट , चुकीच्या व्यवहारात सहभाग नाही.

खा. संजय राऊत यांनी आजच्या पत्रकार परिषदेत कोविड उपचार केंद्रातील गैरव्यवहाराबाबत मी केलेल्या आरोपांबाबत तसेच त्यांचे प्रवीण राऊत, सुजीत पाटकर यांच्याशी असलेल्या संबंधाबाबत एक शब्दही उच्चारला नाही, याकडेही डॉ. सोमय्या यांनी लक्ष वेधले.