‘राऊतांनी गौप्यस्फोट करण्याचं सांगून पुरती निराशा केली, 420 चा गुन्हा दाखल करा’

मुंबई : शिवसेना खासदार संजय राऊत (MP Sanjay Raut Press) यांनी आज पत्रकार परिषद घेऊन केंद्रातील आणि राज्यातील भाजपवर हल्लाबोल (Raut Criticized BJP) केला आहे. केंद्रीय तपास यंत्रणांचा दबाव आणून आम्हाला अडकवण्याचा प्रयत्न केला जात आहे. माझ्याविरोधातील सर्व प्रकरणे खोटी असल्याचा दावा संजय राऊत यांनी यावेळी केला.

दरम्यान, राऊत यांच्या पत्रकार परिषदेत अनेक गौप्यस्फोट होतील अशी आशा तमाम मराठी जनतेला होती मात्र या पत्रकार परिषदेत करण्यात आलेले आरोप पाहिल्यानंतर आता भाजप नेते राऊत यांची खिल्ली उडवत टीका करू लागले आहेत. मनसे नेते संदीप देशपांडे यांनी देखील संजय राऊत यांची खिल्ली उडवत जोरदार टोला लगावला आहे.

‘संजय राऊत हे भाजपमधील साडे तीन लोकांची नावं सांगणार होते. पण त्यातील स देखील बाहेर आला नाही. राऊत यांनी पत्रकार परिषदेत मोठा गौप्यस्फोट करण्याचा दावा केला होता. पण त्यांनी सर्वांची पुरती निराशा केली आहे. त्यामुळे राऊत यांच्यावर फसवणुकीचा, 420 चा गुन्हा दाखल करावा’. असा चिमटा संदीप देशपांडे यांनी काढला आहे.