‘काँग्रेस व मित्र पक्ष एकत्र लोकसभा निवडणुका लढल्या तर ४०-४५ जागा जिंकू शकू असे चित्र राज्यात आहे’ 

मुंबई – काँग्रेस कोअर कमिटीच्या (Congress Core Committee) बैठकीत मुंबईत ३१ ऑगस्ट व १ सप्टेंबर रोजी होणाऱ्या बैठकीसंदर्भात चर्चा करण्यात आली. या बैठकीला काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे यांचे दोन प्रतिनिधीही उपस्थित होते. मुंबईत होणाऱ्या बैठकीचा आढावा घेण्यात आला आहे. या महत्वपूर्ण बैठकीतून देशात एक संदेश गेला पाहिजे त्याच्या तयारीवर चर्चा करण्यात आली. मुंबईतील ‘इंडिया’ (INDIA) आघाडीची बैठक देशाला दिशा देणारी ठरेल, असा विश्वास महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी व्यक्त केला.

एमसीए क्लब येथे काँग्रेसच्या कोअर कमिटीची बैठक पार पडली. या बैठकीला प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण, सुशीलकुमार शिंदे, तेलंगणाचे प्रभारी माणिकराव ठाकरे, विधान परिषदेतील काँग्रेस पक्षाचे गटनेते सतेज ऊर्फ बंटी पाटील, प्रदेश कार्याध्यक्ष, माजी मंत्री नसीम खान, बस्वराज पाटील, आमदार कुणाल पाटील, माजी खासदार मिलिंद देवरा, मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे, प्रदेश सरचिटणीस देवानंद पवार, प्रमोद मोरे आदी नेते उपस्थित.

बैठकीनंतर प्रसार माध्यमांशी बोलताना नाना पटोले म्हणाले की, राज्यात ३ सप्टेंबरपासून पदयात्रा सुरु होत असून या पदयात्रेची रुपरेषा ठरवण्यात आली आहे. ४८ लोकसभा मतदारसंघातील निरिक्षकांच्या अहवालावरही या बैठकीत चर्चा करण्यात आली. केंद्रात व राज्यातील भाजपा सत्तेला उखडून टाकून काँग्रेसची सत्ता आणणे हाच आमचा प्लॅन आहे. महाराष्ट्र हे काँग्रेस विचारांचे राज्य आहे. काँग्रेस व मित्र पक्ष एकत्र लोकसभा निवडणुका लढल्या तर ४०-४५ जागा जिंकू शकू असे चित्र राज्यात आहे. त्यासाठी काँग्रेसची तयारी करत आहे. आमचे टार्गेट भारतीय जनता पक्ष आहे, जे पक्ष सोबत येतील त्यांच्यासह लढण्याची काँग्रेसची भूमिका आहे. शेतकरी, तरुणांच्या आत्महत्या वाढत आहेत, बेरोजगारी वाढली आहे, नोकऱ्या नाहीत, व्यवसाय चालत नाहीत यातून पुण्यात २१८ तरुणांनी आमहत्या केल्या आहेत. राज्यातील इतर भागातही हीच परिस्थिती आहे पण लोकं मेली तरी चालतील पण सत्ता कायम राहली पाहिजे ही सत्तेला चिकटून बसण्याची भाजपाची प्रवृत्ती आहे.