INDvsAUS 2nd Test: ख्वाजा आणि पीटरच्या अर्धशतकी खेळी, पहिल्या डावात भारतापुढे २६४ धावांचे लक्ष्य

INDvsAUS 2nd Test: भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया (India vs Australia) संघात दिल्ली येथे सुरू असलेल्या दुसऱ्या कसोटी (2nd Test) सामन्यात पहिल्या दिवशी पाहुण्यांनी चांगला खेळ केला. भारतीय गोलंदाजांच्या भेदक माऱ्यामुळे संकटात अडकलेल्या ऑस्ट्रेलिया संघाचा डाव सलामीवीर उस्मान ख्वाजा आणि पीटर हँडस्कॉम्ब यांनी सांभाळला. या दोन्ही फलंदाजांनी चिवट झुंज देत संघाला २६३ धावांपर्यंत पोहोचवले. परिणामी भारताला पहिल्या डावात २६४ धावांचे आव्हान मिळाले आहे.

प्रथम फलंदाजी करताना ऑस्ट्रेलियाकडून उस्मान ख्वाजाने सर्वाधिक ८१ धावा केल्या. १२५ चेंडूंचा सामना करताना १ षटकार आणि १२ चौकारांच्या मदतीने त्याने ही खेळी केली. त्याच्याबरोबरच पीटर हँडस्कॉम्ब यानेही संघासाठी महत्त्वपूर्ण योगदान दिले. एका बाजूला स्वस्तात विकेट्स जात असताना त्याने दुसरी बाजू धरुन ठेवली. १४२ चेंडूत ९ चौकारांच्या मदतीने ७२ धावांवर तो नाबाद राहिला. या दोघांव्यतिरिक्त ऑस्ट्रेलियाचे इतर फलंदाज मोठ्या धावा करु शकले नाहीत. परिणामी ७८.४ षटकातच २६३ धावांवर त्यांचा डाव संपला.

या डावात भारताकडून आर अश्विन, रविंद्र जडेजा यांनी प्रत्येकी ३ विकेट्स घेतल्या. तर मोहम्मद शमीनेही ४ विकेट्सचे योगदान दिले.