‘माझी पत्नी सोडून गेली म्हणून गावातले लोक मला मोदी म्हणतात’, पटोलेंचा तो गुंड ‘मोदी’ प्रकटला

नागपूर : काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पंतप्रधान मोदींबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्याचा आरोप करण्यात करण्यात आल्या नंतर आपण मोदी नावाच्या गावगुंडाला बोललो असल्याचे स्पष्टीकरण दिले. त्यानंतर नाना पटोले यांनी उल्लेख केलेला मोदी नावाचा गावगुंड अखेर प्रकटला आहे. माझी पत्नी सोडून गेली. म्हणून गावातले लोक मला मोदी म्हणतात. मी दारुचा व्यवसाय करतो. मी गावगुंड आहे, असं या व्यक्तीने म्हटलं आहे.

उमेश घरडे असं या व्यक्तीचं नाव आहे. मीडियासमोर येऊन घरडे याने आपणच गावगुंड असून आपल्याला लोक मोदी संबोधत असल्याचं म्हटलं आहे. माझी पत्नी सोडून गेली म्हणून मला गावातले लोक मोदी बोलतात. मी दारुचा व्यवसाय करतो, गावगुंड आहे, आपण कुणाला घाबरत नाही, असं घरडे याने म्हटलं आहे. या मोदीचं मूळ नाव उमेश घरडे ऊर्फ मोदी असं आहे. आपण नाना पटोले यांना दारूच्या नशेत शिव्या दिल्या आणि विरोधात प्रचार केला, असंही त्याने सांगितलं. त्यामुळे आता हा वाद शमणार का असा प्रश्न आहे.

काय आहे प्रकरण ?

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या बद्दलचे एक बेताल वक्तव्य समोर आले होते. या व्हिडीओमध्ये ते मारण्याची आणि शिव्या देण्याची भाषा करत असल्याचं पाहायला मिळते. आता पटोले यांचा हाच व्हिडीओ जोरदार व्हायरल होत आहे.

व्हिडीओमध्ये पटोले नेमकं काय म्हणाले?

“मी का भांडतो? मी आता मागील 30 वर्षापासून राजकारणात आहे. लोकं पाच वर्षात आपल्या एका पिढीचा उद्धार करुन टाकतात. शाळा, कॉलेज हे करुन आपल्या एक-दोन पिढीचा उद्धार करुन टाकतात. मी एवढ्या वर्षाच्या राजकारणात एक शाळा नाही घेतली. एक ठेकेदारी नाही केली. जो आला त्याला मदत करतो. म्हणून मी मोदीला मारु शकतो, त्याला शिव्या देऊ शकतो आणि म्हणून मोदी माझ्या विरोधात प्रचाराला आला. एक प्रमाणिक नेतृत्व तुमच्या इथे आहे….”असं आक्षेपार्ह आणि वादग्रस्त वक्तव्य नाना पटोले यांनी केल्याचं या व्हिडीओमध्ये पाहायला आणि ऐकायला मिळत आहे. दरम्यान, या व्हिडीओची ‘आझाद मराठी’ पुष्टी करत नाही.