‘छत्रपती शिवाजी महाराजांना क्षुद्र म्हणून राज्याभिषेक नाकारणा-या विचारसरणीचे चंद्रकांत दादा आणि मोदी आहेत’

पुणे : भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील नेहमीच चर्चेत असतात. मात्र त्यांच्या आता एका अजब विधानाने नवा वाद उभा राहिला आहे. ‘छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदू व्होट बँक तयार केली; वाजपेयी, मोदींनी त्यावर कळस चढवला’ असं अजब वक्तव्य चंद्रकांत पाटील यांनी केले आहे. ते पुण्यात झालेल्या पत्रकार परिषदेत तिकीट कापण्याबाबत ते बोलत होते.

तिकीट पक्षाचं असतं त्यामुळे माझं तिकीट कापलं हा शब्दप्रयोगच चुकीचा आहे. तिकीट पक्षाचं असतं, व्होट बँक पक्षाची असते. तुमचं कर्तृत्व पाहून पक्ष तुम्हाला उमेदवारी देत असतो. व्होट बँक ही वर्षानुवर्षे मेहनत घेऊन तयार केलेली असते. असं चंद्रकांत पाटील म्हणाले आहेत.

‘ही व्होट बँक संत, मंहतांपर्यंत, छत्रपती शिवाजी महाराजांपर्यंत पोहोचते. त्यांनी ही हिंदुत्वाची व्होट बँक विकसित केली. अलीकडच्या काळात अटल बिहारी वाजपेयी, आडवाणी, नरेंद्र मोदी आणि सर्वांनी त्यावर कळस चढवला. ती व्होट बँक तुम्हाला मिळते, त्यासाठी तुमचा चेहरा, गाव थोडंसं उपयोगी पडतं. अन्यथा ते तिकीटही, उमेदवारही आणि व्होट बँकही पक्षाची आहे’. चंद्रकांत पाटील यांच्या या अजब विधानावरून आता नवा वाद उभा राहिला आहे.

कॉंग्रेसनेते अतुल लोंढे यांनी याच मुद्यावरून पाटील यांच्यावर टीका केली. ते म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराजांना क्षुद्र म्हणून  राज्याभिषेक नाकारणा-या विचारसरणीचे चंद्रकांत दादा पाटील आणि नरेंद्र मोदी आहेत. महाराजांचे राज्य जाती पाती धर्माच्या पलिकडले होते स्त्री सन्मान करणारे रयतेचे राज्य होते तर नरेंद्र मोदी हे मुठभर लोकांना राष्ट्राची संपत्ती विकणारे आहेत. ८० करोड पेक्षा जास्त लोकांना दारिद्र्य रेषेखाली नेणारे ते आहेत. महाराष्ट्राची जनता ही तुलना कदापी सहन करणार नाही असं लोंढे म्हणाले.