भाजप आमदार जयकुमार गोरे यांच्या विरोधात राष्ट्रवादी आक्रमक 

मुंबई  – मागासवर्गीय समाजातील मयत व्यक्ती पिराजी भिसे यांची खोटी कागदपत्रे बनवून जमीन लाटण्याचा प्रकार माण – खटावचे भाजप आमदार जयकुमार गोरे यांनी केला असून त्यांना तात्काळ अटक करावी यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक झाली असून राज्य मुख्य प्रवक्ते महेश तपासे यांच्या नेतृत्वाखाली सोमवार दिनांक २ मे रोजी सातारा जिल्हा पोलीस अधीक्षकांची भेट घेतली जाणार आहे.

भाजप आमदार जयकुमार गोरे यांच्या विरोधामध्ये दहिवडी पोलीस स्टेशनमध्ये रितसर तक्रार दाखल आहे. त्यांना तात्काळ अटक व्हावी व एकंदरीत मागासवर्गीय समाजाला न्याय मिळावा यासाठी सातारा जिल्हा पोलीस अधीक्षकांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिले जाणार आहे अशी माहिती महेश तपासे यांनी दिली.

भाजपा आमदार जयकुमार गोरे यांच्या या कृत्यामुळे एकंदरीतच भाजपाचा मनुवादी चेहरा जनतेसमोर आलेला आहे. भाजपशासित राज्यांमध्ये दलित आदिवासी व मागासवर्गीयांवर अत्याचार वाढत चालले आहे हे नव्याने सांगण्याची आवश्यकता नाही पण तशाप्रकारचा अत्याचार महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे सरकार असताना आम्ही कदापी होऊ देणार नाही असा निर्धार महेश तपासे यांनी व्यक्त केला.

नुकताच झालेल्या मंत्रीमंडळाच्या बैठकीमध्ये राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सामाजिक न्याय विभागाच्या सर्व महामंडळांना भरघोस निधी देण्याचे जाहीर केले आहे त्यामुळे आम्ही मागासवर्गीयांवर कुठल्याच प्रकारचा अत्याचार होऊ देणार नाही असा विश्वासही महेश तपासे यांनी व्यक्त केला आहे. यावेळी एसपींच्या भेटीवेळी सातारा जिल्ह्यातील स्थानिक राष्ट्रवादीचे पदाधिकारी तसेच मागासवर्गीय समाजातील काही स्थानिक नेतेही उपस्थित राहणार आहेत.