बंडातात्यांच्या वादग्रस्त वक्तव्याने राजकारण पेटणार, राष्ट्रवादी काँग्रेस उतरणार रस्त्यावर

पुणे : साताऱ्यामध्ये बंडातात्या कराडकर यांनी वाईन विक्रीच्या विरोधात आंदोलन केलं होतं. या आंदोलनादरम्यान त्यांनी सुप्रिया सुळे तसेच पंकजा मुंडे या दारू पितात असा थेट आरोप केला आहे. सुप्रिया सुळे राजकारणात येण्यापूर्वी त्यांचे दारू पिऊन रस्त्यावर पडलेले फोटो तुम्हांला ढीगाने सापडतील असा दावा बंडातात्या कराडकर यांनी केला आहे.

साताऱ्यात बंडातात्या कराडकर यांच्या व्यसनमुक्त युवक संघाच्या वतीने दंडवत दंडुका आंदोलन करण्यात आलं. यावेळी बोलत असताना बंडातात्या कराडकर यांनी नेत्यांची मुलं रस्त्यावर दारू पिऊन पडत असल्याचे पुरावे आहेत असं म्हटलं आहे.

एवढंच नाही तर कराडकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि अजित पवारांची जोडी म्हणजे ढवळ्याशेजारी पोवळा बांधला वाण नाही पण गुण लागला अशी आहे असं म्हणत सरकारवरही टीका केली आहे. दारू विक्रीचा निर्णय अजितदादांचा, मंदिरं खुली करायची नाही, ज्ञानोबारायांचा सोहळा काढायचा नाही हा निर्णय अजितदादांचा आहे. मी हे जाहीरपणे सांगतो, मनमानी आणि दादागिरी अजितदादा करतात असं देखील ते म्हणाले.

दरम्यान, आता या आरोपामुळे बंडातात्या कराडकर हे महाविकास आघाडीच्या रडारवर आले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस आता बंडातात्या विरोधात रस्त्यावर उतरणार आहे. पुण्यात उद्या सकाळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने फर्ग्युसन रस्त्यावर ज्ञानेश्वर पादुका चौक येथे तीव्र निषेध आंदोलन करण्यात येणार आहे. याची माहिती पुण्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी ट्विट करून दिली आहे.