‘बंडातात्या कराडकर स्वत:ला कीर्तनकार म्हणवतात आणि अशाप्रकारे स्त्रीत्वाचे धिंडवडे काढतात’

मुंबई : साताऱ्यामध्ये बंडातात्या कराडकर यांनी वाईन विक्रीच्या विरोधात आंदोलन केलं होतं. या आंदोलनादरम्यान त्यांनी सुप्रिया सुळे तसेच पंकजा मुंडे या दारू पितात असा थेट आरोप केला आहे. सुप्रिया सुळे राजकारणात येण्यापूर्वी त्यांचे दारू पिऊन रस्त्यावर पडलेले फोटो तुम्हांला ढीगाने सापडतील असा दावा बंडातात्या कराडकर यांनी केला आहे.

साताऱ्यात बंडातात्या कराडकर यांच्या व्यसनमुक्त युवक संघाच्या वतीने दंडवत दंडुका आंदोलन करण्यात आलं. यावेळी बोलत असताना बंडातात्या कराडकर यांनी नेत्यांची मुलं रस्त्यावर दारू पिऊन पडत असल्याचे पुरावे आहेत असं म्हटलं आहे.

एवढंच नाही तर कराडकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि अजित पवारांची जोडी म्हणजे ढवळ्याशेजारी पोवळा बांधला वाण नाही पण गुण लागला अशी आहे असं म्हणत सरकारवरही टीका केली आहे. दारू विक्रीचा निर्णय अजितदादांचा, मंदिरं खुली करायची नाही, ज्ञानोबारायांचा सोहळा काढायचा नाही हा निर्णय अजितदादांचा आहे. मी हे जाहीरपणे सांगतो, मनमानी आणि दादागिरी अजितदादा करतात असं देखील ते म्हणाले.

दरम्यान, आता शिवसेना नेत्या मनीषा कायंदे यांनी बंडातात्या कराडकर यांच्या वक्तव्यावर तीव्र आक्षेप घेतलाय. बंडातात्या कराडकर स्वत:ला कीर्तनकार म्हणवतात आणि अशाप्रकारे स्त्रीत्वाचे धिंडवडे काढतात. स्त्रियांचा जाहीररित्या अपमान करतात. हे खपवून घेतलं जाणार नाही. त्यांनी जाहीररित्या माफी मागावी. अन्यथा मी पोलिसांना विनंती करते की त्यांनी बंडातात्या यांना जाब विचारावा, त्यांना चौकशीला बोलवावं, त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा, अशी मागणी कायंदे यांनी केलीय.