महाराष्ट्रात कोणत्याही क्षणी राजकीय भूकंप, अजित पवारांकडे राष्ट्रवादीच्या ४० आमदारांच्या सह्यांचं पत्र तयार?

मुंबई- गेल्या काही दिवसांपासून विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) महायुतीत जातील अशा चर्चा सुरू आहेत. तसेच अजित पवारांनी नुकतीच केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Ajit Pawar Meets Amit Shah) यांची भेट घेतल्याचेही म्हटले जात आहे. यातच आता एक महत्वाची माहिती समोर आली आहे. अजित पवारांबरोबर सध्या ४० आमदार जायला तयार आहेत, यात पक्षातील काही बड्या नेत्यांचाही समावेश आहे.

अजित पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या ५३ आमदारांपैकी ४० आमदारांच्या सह्या घेतल्या असल्याची चर्चा रंगली आहे. तसेच या आमदारांच्या सह्याचं पत्र घेऊन अजित पवार राज्याचे राज्यपाल यांना भेटण्याची चर्चा देखील रंगली आहे. अजित पवार विधानभवन परिसरात रवाना झाले असून तिथे ते काही आमदारांची भेट घेणार असल्याचं सांगण्यात येत आहे. त्यामुळे राजकीय घडामोडींना वेग आलं आहे. न्यू इंडियन एक्सप्रेसने याबाबत वृत्त दिले आहे.