मोठी बातमी : अखेर अजितदादांनी सोडले मौन; म्हणाले,आमदारांची बैठक मी…

मुंबई- गेल्या काही दिवसांपासून विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) महायुतीत जातील अशा चर्चा सुरू आहेत. तसेच अजित पवारांनी नुकतीच केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Ajit Pawar Meets Amit Shah) यांची भेट घेतल्याचेही म्हटले जात आहे. यातच आता  अजित पवार यांनी मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेस आमदारांची बैठक बोलावण्यात आल्याच्या बातम्या प्रसिद्ध झाल्या आहेत. आता यावर  खुद्द अजित पवार यांनी मौन सोडले असून स्पष्ट भूमिका मांडली आहे.

अजित पवार म्हणाले, खारघर (नवी मुंबई) येथे रविवारी झालेल्या ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार सोहळ्याच्यावेळी झालेल्या दुर्घटनेत मृत्यूमुखी पडलेल्या श्रीसदस्यांच्या कुटुंबियांना आणि उष्माघातामुळे बाधित झालेल्या श्रीसदस्यांना भेट देऊन त्यांना धीर देण्यासाठी मी ‘एमजीएम’ हॉस्पिटलमध्ये सोमवारी पहाटेपर्यंत उपस्थित होतो. सोमवारी माझा कोणताही नियोजीत कार्यक्रम नव्हता, मी मुंबईतच आहे. उद्या, मंगळवार दि. 18 एप्रिल 2023 रोजी मी विधानभवनातील माझ्या कार्यालयात उपस्थित राहणार असून कार्यालयाचे नियमीत कामकाज सुरु राहणार आहे. मंगळवारी मी आमदारांची बैठक बोलावल्याच्या बातम्या काही माध्यमातून प्रसिद्ध होत आहेत, त्यापूर्णत: असत्य आहेत. मी आमदार अथवा पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावली नाही, याची नोंद घ्यावी.