‘सत्तेच्या शेवटच्या घटका मोजणाऱ्या भाजपला पुणेकर अन महापुरुषांचे मावळे माफ करणार नाहीत’

पुणे : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह सध्या महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत. आज ते नगरमध्ये होते, उद्या ते पुण्यात असणार आहेत. त्यांच्या पुण्यातल्या नियोजित दौऱ्याचा सविस्तर तपशीलही आला आहे. पुणे महापालिकेकडून अमित शहांच्या दौऱ्याची तयारी पूर्ण करण्यात आली आहे.

अमित शहांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर महापालिकेच्या इमारतीवर विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. त्यामुळे परिसर उजळून गेला आहे. उद्या महापालिकेत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचे अमित शाह यांच्या हस्ते अनावरण होणार आहे. तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे भूमिपूजनही अमित शाह यांच्या हस्ते होणार आहे.

भाजपने या भूमिपूजनाच्या कार्यक्रमाची बॅनरबाजी संपूर्ण शहरभर केली आहे. मात्र या बॅनरवर भाजपच्या डझनभर नेत्यांचे फोटो असून भूमिपूजन, अनावरण होणाऱ्या महापुरुषांचे कुठेही फोटो दिसत नाहीत. यावरून आता विरोधकांकडून भाजपवर टीकेची झोड उठवली जात आहे.

‘ज्या महापुरुषांच्या पुतळ्याचे भूमिपूजन या अनावरण आहे त्याचा फोटो कुठे आहे ? पुण्यातील सत्तेच्या शेवटच्या घटका मोजत आहात पुणेकर अन महापुरुषांचे मावळे माफ करणार नाहीत’ असा घणाघात राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नेत्या रुपाली पाटील-ठोंबरे यांनी केला आहे.