‘आपल्याला २०२४ ची विधानसभा निवडणूक जिंकायचीच आहे, मात्र…’

सोलापूर : राष्ट्रवादी परिवार संवाद यात्रेच्या पाचव्या पर्वाच्या दुसऱ्या दिवशी आज प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सोलापूर ग्रामीण मतदारसंघाचा आढावा घेत पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी संवाद साधला. महाराष्ट्राच्या प्रत्येक कार्यकर्त्याला हलवून जागं करण्यासाठी हा परिवार संवाद दौरा आहे. त्यामुळे आम्ही प्रत्येक जिल्हा, तालुका, गाव, शहर फिरून तेथील कार्यकर्त्यांशी संवाद साधत आहोत, असे जयंत पाटील म्हणाले.

आपला पक्ष सर्व स्तरातील लोकांचा विचार करत आहे. विद्यार्थी संघटनेला विद्यार्थ्यांचे जाळे निर्माण करण्याचे आदेश दिले आहेत. हीच संघटना २०२९ला होणाऱ्या निवडणुकांमध्ये पक्षाची खरी ताकद बनेल, अशा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

सोलापूर जिल्ह्यात विविध उपक्रम घ्या, विचारमंथन करण्यासाठी बैठका घ्या, पक्ष वाढविण्यासाठी एक पोषक वातावरण निर्माण करा, गोरगरिबांचे प्रश्न सोडवा, त्यांच्या अडी-अडचणीला धावून जा, ते तुम्हालाच तुमचा प्रतिनिधी म्हणून निवडतील, असा शब्द जयंत पाटील यांनी कार्यकर्त्यांना दिला.

आपल्याला २०२४ ची विधानसभा निवडणूक जिंकायचीच आहे, मात्र २०२९ साठी पक्षाची मजबूत बांधणी आपल्याला आतापासूनच करावी लागेल. त्यासाठी तरूणांचे जाळे राज्यभरात निर्माण करा. राष्ट्रवादी काँग्रेसला सर्वात मोठा पक्ष बनवायचे असेल तर सोलापूरात आपल्याला मिळालेली प्रत्येक सीट निवडून आणा. बीड, नाशिक जिल्ह्यांनी जास्त आमदार दिले आहेत त्याचप्रमाणे सोलापूरही सर्वात जास्त आमदार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला देऊ शकतो. त्यापद्धतीने पावले टाका, बुथ कमिट्यांवर लक्ष केंद्रित केल्यावर आपल्याला हे यश मिळेल, असे मार्गदर्शन त्यांनी केले.