मोठी बातमी! आयपीएल खेळलेल्या क्रिकेटरला ८ वर्षांचा तुरुंगवास, बलात्कार प्रकरणी आढळला दोषी

Kathmandu court convicts Sandeep Lamichhane: नेपाळ क्रिकेट संघाचा माजी कर्णधार संदीप लामिछाने याला अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी 8 वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे. काठमांडू येथील न्यायालयाने बुधवारी (10 जानेवारी) हा निर्णय दिला. या बलात्कार प्रकरणात संदीपला 10 दिवसांपूर्वीच दोषी ठरवण्यात आले होते. आता शिक्षा सुनावण्यात आली आहे. 23 वर्षीय संदीप नेपाळ क्रिकेटचा एक मोठा चेहरा आहे आणि तो इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) मध्येही खेळला आहे.

शिशिरराज ढकल यांच्या खंडपीठाने बुधवारी (10 जानेवारी) सुनावणी करताना हा निर्णय दिला आहे. त्याला नुकसान भरपाई आणि दंडासह 8 वर्षांची शिक्षा सुनावली. न्यायालयीन अधिकारी रामू शर्मा यांनी याप्रकरणी माहिती दिली आहे.

नेपाळ पोलिसांनी इंटरपोलची मदत घेतली

गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये एका 17 वर्षीय तरुणीने संदीप लामिछानेविरोधात काठमांडू येथील पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. त्या मुलीने त्याच्यावर बलात्काराचा आरोप केला होता. हा आरोप करताना संदीप वेस्ट इंडिजमध्ये होता आणि कॅरेबियन प्रीमियर लीगमध्ये (सीपीएल) जमैका तल्लावाहकडून खेळत होता. त्यानंतर अटक वॉरंट जारी होताच संदीपला तात्काळ देशात परतण्याचे आदेश देण्यात आले.

मात्र, वॉरंट बजावल्यानंतर संदीप लामिछाने फरार झाला असून, त्याचा पत्ता लागू शकला नाही. नेपाळ पोलिसांनी संदीपला अटक करण्यासाठी इंटरपोलची मदत घेतली. त्यानंतर इंटरपोलने संदीपविरोधात ‘डिफ्यूजन’ नोटीस जारी केली होती. काही दिवसांच्या प्रतीक्षेनंतर संदीप जेव्हा काठमांडूतील त्रिभुवन आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरला तेव्हा पोलिसांनी त्याला अटक केली.

संदीपने या प्रकरणाला षडयंत्र म्हटले होते

दुसरीकडे, अटक वॉरंट जारी होताच नेपाळ क्रिकेट असोसिएशनने (CAN) देखील संदीपला निलंबित केले. मात्र, जानेवारी 2023मध्ये संदीप लामिछाने याला मोठा दिलासा मिळाला आणि त्याची जामिनावर सुटका झाली. त्यानंतर संदीप लामिछाने पुन्हा आंतरराष्ट्रीय आणि फ्रेंचायझी क्रिकेटमध्ये परतला.

गेल्या वर्षी काठमांडू येथे अटक होण्यापूर्वी लामिछाने यांनी फेसबुकवर लिहिले होते की, आपण तपासाच्या सर्व टप्प्यांवर पूर्ण सहकार्य करू आणि आपले निर्दोषत्व सिद्ध करण्यासाठी कायदेशीर लढाई लढू. तेव्हा संदीपने हे प्रकरण ‘षड्यंत्र आणि खोटे आरोप’ असल्याचे म्हटले होते.

आयपीएल खेळणारा संदीप हा नेपाळचा पहिला खेळाडू आहे

संदीप नेपाळचा स्टार खेळाडू आहे. जगभरातील क्रिकेट लीग खेळणारा तो देशातील एकमेव खेळाडू आहे. आयपीएलमध्ये खेळणारा संदीप हा नेपाळचा पहिला क्रिकेटपटू आहे. यासह, तो ऑस्ट्रेलियन बिग बॅश लीग (बीबीएल), कॅरिबियन प्रीमियर लीग (सीपीएल) आणि लंका प्रीमियर लीग (एलपीएल) यासह अनेक लीगमध्ये खेळत आहे.

लेगस्पिनर संदीपला 2018 मध्ये पहिल्यांदा ओळख मिळाली, जेव्हा तो पहिल्यांदा आयपीएल खेळला होता. तेव्हा त्यांचे वय अवघे 17 वर्षे होते. संदीपला दिल्ली डेअरडेव्हिल्सने 20 लाख रुपयांना विकत घेतले. संदीपने आयपीएलमध्ये 9 सामने खेळले, ज्यात त्याने 13 विकेट घेतल्या. आंतरराष्‍ट्रीय क्रिकेटमध्‍ये संदीपने नेपाळ संघाकडून 52 टी-20 सामन्यांत 98 आणि 51 एकदिवसीय सामन्यांत 112 विकेट घेतल्या आहेत.

महत्वाच्या बातम्या-

MLA Disqualification Case Verdict : आम्हाला उध्दव ठाकरे यांच्याबद्दल सहानुभूती आहे – प्रकाश आंबेडकर

MLA Disqualification Case : शिंदे गटाकडून आनंदोत्सव, ठाकरे गटाचे आंदोलन

बाळासाहेबांची शिवसेना उद्धव ठाकरेंनी गमावली; शिंदेंचा गट हीच खरी शिवसेना

उलटतपासणीला न येणं ठाकरेंना पडलं महागात; नार्वेकरांनी दाखवून दिली चूक