भारतीय गोलंदाजांपुढे न्यूझीलंडची शरणागती, ‘रोहितसेने’ला विजयासाठी केवळ १०९ धावांची गरज

रायपूरच्या मैदानावर न्यूझीलंड विरुद्ध भारत (IND vs NZ) संघात झालेल्या दुसऱ्या वनडे सामन्यात पाहुण्या संघाची दयनीय अवस्था झाली. प्रथम फलंदाजी करताना न्यूझीलंड संघ ३४.३ षटकातच १०८ धावांवर सर्वबाद झाला. या डावात भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीने शानदार गोलंदाजी केली.

शमीने (Mohammad Shami) पहिल्याच षटकात न्यूझीलंडचा सलामीवीर फिन ऍलनला त्रिफळाचीत करत विकेट्सचा श्रीगणेशा केला. त्याने फिन ऍलनला शून्य धावेवर बाद केले. पुढे त्याने डॅरिल मिचेल (०१ धाव) आणि मिचेल ब्रेसवेल (२२ धावा) यांच्याही महत्त्वपूर्ण विकेट्स घेतल्या. तसेच हार्दिक पंड्याने (Hardik Pandya) ६ षटकात १६ धावा देत २ विकेट्स काढल्या. तर वॉशिंग्टन सुंदरनेही ३ षटकात ७ धावा देत २ विकेट्स घेतल्या. शमी, वॉशिंग्टन आणि हार्दिकबरोबरच मोहम्मह सिराज, शार्दुल ठाकूर आणि कुलदीप यादव यांनीही प्रत्येकी १ विकेट घेतली.

या डावात न्यूझीलंडकडून ग्लेन फिलिप्सने सर्वाधिक ३६ धावा केल्या. तर न्यूझीलंडचे ७ फलंदाज एकेरी धावेवरच बाद झाले. आता भारतीय संघाला विजयासाठी केवळ १०९ धावांचे लक्ष्य मिळाले आहे. भारतीय संघाने हे आव्हान पूर्ण केले तर ते २-० च्या फरकाने वनडे मालिकाही जिंकतील.