आम्ही भाजपच्या पाठीशी नसल्याचे वृत्त खोडसाळपणाचं, वैश्य समाजाचा मोठा खुलासा

म्हापसा : गोवा विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजले आहे. प्रचार तोफा थंडावल्या आहेत. प्रचारतोफा थंडावल्या असल्या तरी तापलेलं राजकारण काही थंड व्हायचं नाव घेत नाही. यामध्ये गोव्यात सर्वात जास्त चर्चेत असणारा विधानसभा मतदारसंघ असलेल्या म्हापसा मतदारसंघातून एक मोठी बातमी समोर येत आहे.

नुकतंच एका दैनिकात वैश्य समाजाचा भाजपला पाठिंबा नसल्याचे बातमी प्रसिद्ध करण्यात आली होती. मात्र ही बातमी खोडसाळपणाने दिल्याची माहिती वैश्य संघटना म्हापसा, गोवाचे अध्यक्ष कुंदन नारेकर यांनी दिली आहे. त्यामुळे वैश्य समाज भाजपसोबतच असल्याचे स्पष्ट झाले आहे.

कुंदन नारेकर यांनी प्रसिद्ध केलेल्या पत्रात म्हंटल आहे की, एका दैनिकात १३ फेब्रुवारी रोजी ‘भाजप विरोधात मतदानाचा म्हापसा वैश्य समाजाचा निर्णय’अशा आशयाची आलेली बातमी पूर्णपणे चुकीची आहे. म्हापशात वैश्य समाजाच्या फक्त दोन नोंदणीकृत संघटना आहेत. वैश्य मंडळ म्हापसा आणि वैश्य संघटना म्हापसा, गोवा. या संघटनांतर्फे आम्ही खुलासा करू इच्छितो की, सादर बातमीत उल्लेख केलेल्या बैठकीशी आमच्या संस्थांचा काहीही काहीही संबंध नाही. या दोन्हीही संघटनेने स्थापनेपासून कधीही राजकारण केले नाही. जाती बंधूंनी स्वतःच्या कर्तृत्वावर आणि कर्तबगारीवर पुढे यावे यासाठी दोन्ही संघटना कार्यरत आहेत. मात्र खोडसाळपणाने दिलेल्या चुकीच्या वृत्तामुळे गैरसमज होऊ नये म्हणून हा खुलासा करण्यात येत आहे’.