सल्ल्याची गरज असेल तेव्हा शरद पवार मला फोनवरुन मार्गदर्शन करतात; एकनाथ शिंदेचा गौप्यस्फोट

पुणे- महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी शनिवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांचे तोंडभरुन कौतुक केले. सहकार क्षेत्रातील शरद पवारांचे योगदान दुर्लक्षित करता येणार नाही, असे ते (Eknath Shinde Praises Sharad Pawar) यावेळी म्हणाले. पुण्यातील वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या ४६ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत एकनाथ शिंदे बोलत होते. शरद पवार हे वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटचे अध्यक्ष आहेत. त्यामुळे या कार्यक्रमाच्या निमित्ताने पहिल्यांदाच एकनाथ शिंदे आणि शरद पवार एकत्र मंचावर दिसले.

‘पवारसाहेब नेहमीच सगळ्यांना मार्गदर्शन करत असतात. ते एक अनुभवी नेते आहेत. त्यांनी गेल्या अनेक वर्षांपासून राज्यात आणि देशात विविध जबाबदाऱ्या पार पाडल्या आहेत. त्यांचं योगदानही फार मोठं आहे. सत्तेत कोण बसलंय हे न पाहता राज्याच्या आणि राज्यातील जनतेच्या हितासाठी ते नेहमी मार्गदर्शन करतात. मलाही जेव्हा-जेव्हा आवश्यकता असेल तेव्हा ते फोन करतात आणि मार्गदर्शन करतात,’ असा गौप्यस्फोट एकनाथ शिंदे यांनी यावेळी केला.