न्यूझीलंडच्या WTC विजेत्या विलियम्सनचा कसोटी कर्णधारपदावरून राजीनामा, ‘हा’ खेळाडू नवा कॅप्टन

न्यूझीलंड क्रिकेटमधून आज सर्वात मोठी बातमी समोर आली आहे. न्यूझीलंडचा कर्णधार केन विलियम्सन (Kane Williamson) याने त्याच्या कसोटी संघाच्या नेतृत्त्वपदाचा राजीनामा दिला आहे. न्यूझीलंड संघाच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वी त्याने हा निर्णय घेतला आहे. आता न्यूझीलंड दौऱ्यात विलियम्सनच्या जागी टीम साउदी संघाची कमान सांभाळेल. विलियम्सनच्या नेतृत्त्वाखाली इंग्लंड संघाने पहिलीवहिली कसोटी चँपियनशीप स्पर्धा जिंकली होती.

32 वर्षीय केनने 40 कसोटी सामन्यांमध्ये न्यूझीलंडची कमान (Kane Williamson Step Down As Test Captain) सांभाळली, ज्यात त्याने 22 कसोटी सामन्यांमध्ये संघाला विजय मिळवून दिला. त्याच्या नेतृत्वाखाली 10 कसोटीत पराभव पत्करावा लागला, तर 8 कसोटी सामने अनिर्णित राहिले. तो म्हणाला, “कसोटी क्रिकेटमध्ये न्यूझीलंडचे नेतृत्व करणे माझ्यासाठी नेहमीच खास राहिले आहे. हा क्षण अप्रतिम होता.”

केन विलियम्सन पुढे म्हणाला, “मला कसोटी क्रिकेटमधील आव्हान नेहमीच आवडते. संघाचे नेतृत्व करताना मी त्याचा सामना केला. जर तुम्हाला कर्णधारपद मिळाले तर तुमच्यासोबत मैदानाच्या आत आणि बाहेरही दडपण आणते. माझ्या कारकिर्दीच्या ज्या टप्प्यावर मी आता उभा आहे, मला वाटले की, कसोटी कर्णधारपदावरून पायउतार होण्याची हीच योग्य वेळ आहे.”

पुढील 2 वर्षात वनडे-टी20 क्रिकेटचे दोन विश्वचषक आहेत, ते लक्षात घेऊन मी न्यूझीलंड क्रिकेटशी बोलून हे पाऊल उचलले आहे, असे तो म्हणाला.