गोदी मिडियावर बहिष्कार टाका, आणि… ; निखील वागळे यांनी जनतेला केलं ‘हे’ आवाहन

मुंबई – आज राष्ट्रीय पत्रकार दिन असून आजच्या दिवशी जेष्ठ पत्रकार निखील वागळे यांनी लिहलेली एक फेसबुक पोस्ट सध्या चर्चेत आहे. या पोस्टमधून त्यांनी आपल्या पत्रकारीतेबाबत त्यांना नेमकं काय वाटतं ते लिहिले आहे. सोबतच त्यांनी जनतेला आवाहन देखील केले आहे. पाहूया नेमकी काय आहे निखील वागळे यांची पोस्ट.

ते म्हणतात,  आज सकाळी राष्ट्रीय पत्रकार दिनाच्या शुभेच्छा दिल्या तर अनेक तीव्र प्रतिक्रिया आल्या. पत्रकारितेचा कणा मोडलाय असं अनेकांचं म्हणणं होतं. पत्रकारिता विकली गेलीय हा आरोप आता नवा नाही. त्यात तथ्यही आहे. पण हे मान्य करताना जे अपवाद आहेत त्यांना मानाचा मुजरा केल्याशिवाय पुढे जाता येणार नाही. करण थापर, सिद्धार्थ वरदराजन, पी. साईनाथ, रवीश कुमार, अभिसार शर्मा, आरफा शेरवानी, अजित अंजुम, नितीन सेठी, प्रतिक सिन्हा अशी उदाहरणं प्रत्येक भाषेत देता येतील. मराठीत राम जगताप, विनोद शिरसाट, अद्वैत मेहता, अलका धुपकर, आशिष दिक्षित, विनायक गायकवाड, प्राजक्ता धुळप, दिप्ती राऊत, अमेय तिरोडकर, सुधाकर कश्यप,रवी आंबेकर, किरण सोनावणे, अभिजीत कांबळे असे अनेक सहकारी मित्र आहेत ज्यांचा सडलेल्या व्यवस्थेविरुद्धचा संघर्ष रोज चालू आहे. याहिपलिकडे मला माहित नसलेले अनेक असतील.

आदर्शवादाची कास न सोडलेले तरुण पत्रकार मला सातत्याने भेटत असतात. मिडियाची व्यवस्था सडलेली आहे हे खरं, पण त्यातूनही मार्ग काढण्याची या सर्वांची धडपड कौतुकास्पद आहे. सर्व पिढ्यामध्ये असे पत्रकार अपवादात्मकच असतात, पण तेच आपल्या प्रामाणिकपणाने आशा तेवत ठेवतात. आज राष्ट्रीय पत्रकार दिनाच्या निमित्ताने माझं तुम्हाला आवाहन आहे की अशा पत्रकारांना बळ द्या. गोदी मिडियावर बहिष्कार टाका. पत्रकारितेच्या पर्यायी प्रवाहासोबत जोडून घ्या. वायर, पारी, आल्ट न्यूज, न्यूज लॅांड्रीसारखे प्रयत्न सर्व भाषात चालू आहेत. यासाठी द इंडिपेंडंट ॲंड पब्लीक स्पिरिटेड मिडिया फौंडेशनच्या वेबसाईटला भेट द्या.अशा वेगळ्या प्रयत्नांना त्यांचं मोठं पाठबळ मिळालं आहे. मला आशा आहे, एक दिवस असा येईल जेव्हा याच प्रयत्नाने पत्रकारितेच्या आसमंतातले काळे ढग दूर होतील. लडेंगे, जितेंगे!