‘राजकारणी मुर्दाडपणे वागले तर जनता हिंसक होणारच’, वागळेंनी केले शाईफेकीचे समर्थन 

पुणे –  भाजप नेते आणि राज्याचे उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी औरंगाबादमधील एका कार्यक्रमात महापुरुषांबद्दल बेताल वक्तव्य करत नवा वाद निर्माण केला. त्यांच्या या वक्तव्याचा समता सैनिक दलाच्या कार्यकर्त्यांकडून पिंपरीत शाईफेक करत निषेध करण्यात आला.

या घटनेवरून आता राज्यातील वातावरण चांगलेच तापले आहे. यावर प्रतिक्रिया देताना जेष्ठ पत्रकार निखील वागळे (Nikhil Wagle) यांनी या शाईफेकीचे एकप्रकारे समर्थनच केले आहे. ते म्हणाले,  भाजपवाल्यांनी (BJP) हे नीट लक्षात ठेवावं- राजकारणी मुर्दाडपणे वागले तर जनतेची प्रतिक्रिया हिंसकच होणार. टाळी एका हाताने वाजत नाही. चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांच्या वक्तव्याचा निषेध केला. तसेच महाराष्ट्राचा वारंवार अपमान करणाऱ्या भाजपला मतपेटीतून धडा शिकवला पाहिजे. हा महाराष्ट्रद्रोही पक्ष आहे, अशा शब्दांत त्यांनी भाजपावर निशाणा साधला आहे.

महात्मा फुले व छत्रपती शिवाजी महाराज यांना मानणाऱ्यांचीही त्यांनी कानउघडणी केली आहे. माफ करा, मी काही अडचणीचे प्रश्न विचारणार आहे. फुले-आंबेडकरांचा अपमान झाल्यावर भीमसैनिक रस्त्यावर उतरले. एरवी शिवाजी महाराजांचा वारसा सांगणारे मर्द मराठे कुठे आहेत? महात्मा फुलेंची परंपरा मानणारे माधव आणि इतर ओबीसी अजून झोपले आहेत काय? कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा!, अशा आशयाचं ट्वीट निखील वागळे यांनी केलं आहे.

दरम्यान चंद्रकांत पाटील यांनी भाषण करताना महात्मा जोतिबा फुले, सावित्रीबाई फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि कर्मवीर भाऊराव पाटील यांच्याविषयी बोलताना वादग्रस्त विधान केलं होतं. शिक्षणाचा प्रचार करण्यासाठी महापुरुषांनी भीक मागतल्याचं धक्कादायक विधान त्यांनी केलं होतं. त्यांच्या वक्तव्यावर सर्वत्र टीका झाल्यानंतर त्यांनी आपल्या वक्तव्यावर दिलगिरी व्यक्त केली होती. पण त्यांच्या वक्तव्याचे पडसाद आता राज्यभरात उमटताना दिसत आहे.