शाईफेक प्रकरण : बारामतीत राष्ट्रवादीच्या नेत्याविरोधात गुन्हा दाखल; धक्कादायक माहिती आलीय समोर 

मुंबई –   भाजप नेते आणि राज्याचे उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर पिंपरीमध्ये शाईफेक करण्यात आली आहे. पाटील यांनी औरंगाबादमधील एका कार्यक्रमात बोलताना महापुरुषांबाबत केलेल्या वक्तव्याच्या निषेधार्थ ही शाईफेक करण्यात आली आहे. समता सैनिक दलाच्या कार्यकर्त्यांकडून हे भ्याड कृत्य केलं गेल्याचं सांगितलं जात आहे. याप्रकरणी तीन जणांना पोलिसांनी अटक केली आहे.

चंद्रकांत पाटील यांनी भाषण करताना महात्मा जोतिबा फुले, सावित्रीबाई फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि कर्मवीर भाऊराव पाटील यांच्याविषयी बोलताना वादग्रस्त विधान केलं होतं. शिक्षणाचा प्रचार करण्यासाठी महापुरुषांनी भीक मागतल्याचं धक्कादायक विधान त्यांनी केलं होतं. त्यांच्या वक्तव्यावर सर्वत्र टीका झाल्यानंतर त्यांनी आपल्या वक्तव्यावर दिलगिरी व्यक्त केली होती. पण त्यांच्या वक्तव्याचे पडसाद आता राज्यभरात उमटताना दिसत आहे. त्यांच्यावर पिंपरीत शाईफेक करण्यात आलीय.

दरम्यान,  पालकमंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांच्यावर जो कोणी शाईफेक करेल त्याला 51 हजार रुपयांचं बक्षीस दिलं जाईल, अशी घोषणा करणाऱ्या राष्ट्रवादीच्या 14 कार्यकर्त्यांवर बारामतीत (Baramati) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

चंद्रकांत पाटील यांनी केलेल्या वादग्रस्त वक्यव्यानंतर बारामती तालुक्यातील सोमेश्वरनगर येथे राष्ट्रवादीचे सोमेश्वर कारखान्याचे संचालक ऋषिकेश गायकवाड आणि इतर कार्यकर्त्यांनी मोर्चा काढला होता. मोर्चा काढत जो कोणी चंद्रकांत पाटील यांना काळं फासण्याचं काम करेल, त्याला 51 हजार रूपयांचं बक्षीस दिलं जाईल, असं चिथावणीखोर भाषणही केलं होतं.   चंद्रकांत पाटील यांच्यावर झालेल्या शाईफेक हल्ल्यानंतरही हे बक्षीस लवकरच मनोज घरबडेला दिलं जाईल हा  व्हिडीओ देखील या कार्यकर्त्यांकडून व्हायरल करण्यात आला होता.

ऋषिकेश गायकवाड यांच्यासह मनोज घरबडे यांच्यासह अन्य 13 जणांच्या विरोधात बारामती भाजप शहराध्यक्ष पांडुरंग कचरे यांनी तक्रार दिली होती. त्यावरून बारामती शहर पोलीस स्टेशननं 15 जणांवर रात्री उशीरा गुन्हा दाखल केला आहे. चंद्रकांत पाटलांवर झालेल्या शाईफेकी मागे राष्ट्रवादीच्या नेत्याचा हात आहे का ? असा सवाल उपस्थित होऊ लागला आहे. यातील नेमके सत्य काय आहे हे पोलीस तपासातून बाहेर येईल असं सांगितले जात आहे.