आटा चक्की मशीन द्वारे ‘निरंजन’ ने केले ५० महिलांना आत्मनिर्भर

पुणे : दोन वेळेचे जेवण मिळविण्यासाठी धडपड करणा-या, संसाराचा गाडा स्वत:च्या खांद्यावर पेलणा-या आणि मानाने समाजात राहण्याकरिता कष्ट करण्याची तयारी असणा-या ५० गरजू महिलांना पुण्यातील निरंजन सेवाभावी संस्थेने आत्मनिर्भर करण्याकरिता पुढाकार घेतला आहे. केवळ धान्य, पैसे किंवा वस्तुरूपी मदत न देता, त्या महिलांना स्वत: च्या पायावर उभे करण्याकरिता संस्थेने आटा चक्की मशिन देऊन त्यांना महिला उद्योजिका होण्यास प्रोत्साहन दिले आहे.

निरंजन सेवाभावी संस्थेतर्फे म्हात्रे पूलाजवळील कृष्णसुंदर लॉन्स येथे ५० गरजू महिलांना आटा चक्की मशिन देण्याच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी अप्पर पोलीस आयुक्त प्रवीण साळुंके, क्लीन सायन्स अँड टेक्नॉलॉजी लि. पुणेचे ज्येष्ठ उद्योजक कृष्णकुमार बूब, दिलीप मुंदडा, निरंजन सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष डॉ.नवनीत मानधनी, सचिव सीए दुर्गेश चांडक आदी उपस्थित होते.

कृष्णकुमार बूब म्हणाले, शिक्षण कमी असेल किंवा परिस्थितीमुळे हतबलता असेल, तर स्त्रियांना घरी बसून काय करता येईल, हा प्रश्न असतो. त्यामुळे आटा चक्की मशिनच्या माध्यमातून महिलांना आत्मनिर्भर करण्याचा प्रयत्न आम्ही केला आहे. क्लिन सायन्स मार्फत आम्ही अनेक ठिकाणी अशी मदत दिली आहे. निरंजन सेवाभावी संस्थेसोबत शैक्षणिक क्षेत्रात आणि आता महिलांकरिता उद्योग क्षेत्रात आम्ही सहकार्य करीत आहोत. त्यामुळे यापुढेही आम्ही निरंजन सेवाभावी संस्थेसोबत कार्य करु.

प्रवीण साळुंके म्हणाले, भारतीय स्वातंत्र्यानंतर ७५ वर्षात तळागाळात मुलभूत सेवा पोहोचल्या नाहीत. शासन सर्वदूर पोहचू शकत नाहीत, त्या ठिकाणी सामाजिक संस्था पोहोचतात. समाजातील गरजूंकरिता काम करण्याची आज गरज असून ते काम सामाजिक संस्था करत आहेत. निरंजन सेवाभावी संस्थेचे काम समाजातील गरजू घटकांसाठी सुरु असून त्याप्रमाणे इतरही संस्थांनी करावे.

डॉ.नवनीत मानधनी म्हणाले, घरच्या घरी धान्य दळण्याचा व्यवसाय या महिलांनी करावा आणि आपले व आपल्या कुटुंबाचे पालनपोषण करावे, हा यामागील उद्देश. संस्था तब्बल १७ हजार रुपये किमतीचे आटा चक्की अत्याधुनिक मशीन महाराष्ट्राच्या विविध भागातील महिलांना देणार आहे. त्या महिलांना आत्मनिर्भर करून समाजामध्ये त्यांचा आदर्श निर्माण व्हावा, याकरिता हा छोटासा प्रयत्न आहे, असेही त्यांनी सांगितले. विराज तावरे यांनी सूत्रसंचालन केले. सीए विशाल राठी यांनी आभार मानले.