शिंदे गट भाजपमध्ये संघर्ष झाला सुरु! मंत्रीपद गेलं खड्यात आता सोडणार नाही, मंत्र्याचा इशारा

Mumbai – राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आणि भाजपचे प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल केलेल्या वादग्रस्त विधानामुळे सुरु असलेला वाद थांबताना दिसत नाहीये. यामध्येच आमदार प्रसाद लाड यांनी शिवरायांचा जन्म कोकणात झाल्याचं एका कार्यक्रमात सांगितले. लाड यांच्या विधानानंतर राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून टीका करण्यात आली. आता सत्तेत सहभागी असणाऱ्या शिंदे गटातील मंत्री गुलाबराव पाटील यांनी वादग्रस्त विधाने करणाऱ्या नेत्यांना सज्जड दम भरला आहे.

“छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल ज्यांना माहिती आहे, त्यांनी यावर बोलावं. शिवरायांबाबात वाकडं तिकडं बोललं, तर कोणत्याही पक्षाचा असो माफ केलं जाणार नाही. शिवाजी महाराज हे देवाचे देव आहेत. शिवरायांच्याबद्दल बोलण्यासाठी एक आचारसंहिता करण्याची गरज आहे,” असं मंत्री आणि बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे नेते गुलाबराव पाटील म्हणाले.

तसंच, “महाराजांच्या नखाची बरोबरी या नालायकांकडून होऊ शकत नाही. मंत्रिपद गेलं खड्ड्यात, शिवरायांचा अपमान केल्यास सोडणार नाही,” असा इशाराही गुलाबराव पाटलांनी दिला. ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते.