‘मी कुस्तीत कधी राजकारण आणलं नाही पण राजकारणात जेव्हा कुस्ती करायची तेव्हा कुस्ती करायचीच’

पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी सोमवारी पुण्यातील शिरुर येथे रामलिंग महाराज यात्रोत्सवात आयोजित राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेच्या बक्षिस वितरण सोहळ्याला उपस्थिती लावली. यावेळी शरद पवार यांच्या भाषणाची चर्चा सध्या राज्यभर सुरु आहे.

व्यासपीठावर बोलताना आयोजकांनी शरद पवारांच्या वयाचा उल्लेख केला होता. यानंतर शरद पवार यांनी मी अजून म्हातारा झालो नसल्याचा पुन्हा उल्ल्लेख केल्याने उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला. तर दुसरीकडे कुस्तीगीर परिषदेचा अध्यक्ष असणाऱ्या शरद पवार यांनी आपल्या शैलीत यावेळी विरोधकांना टोला लगावला आहे. ‘मी कुस्तीत कधी राजकारण आणलं नाही पण राजकारणात जेव्हा कुस्ती करायची तेव्हा कुस्ती करायचीच’ असा टोला पवारांनी विरोधकांना लगावला आहे.

काय म्हणाले शरद पवार ?

“मी आयोजकांवर नाराज आहे. माझी त्यांच्यावर नाराजी आहे. आयोजक बोलले की या वयात… मी काही अजून म्हातारा झालेलो नाही,” असं शरद पवार म्हणाले. शरद पवारांनी यावेळी विरोधकांवरही अप्रत्यक्षपणे निशाणा साधला. ते म्हणाले की, “कुस्तीगीर परिषदेचा माझा जुना संबंध आहे. मी कुस्तीगीर परिषदेचा अध्यक्ष आहे. नवनवीन पैलवान तयार होत असल्याचा आनंद आहे. राजकारण एका बाजूला आणि क्रीडा क्षेत्र एका बाजूला. मी क्रीडा क्षेत्रात कधी राजकारण येऊ देत नाही आणि राजकारणात जेव्हा कुस्ती करायची तेव्हा कुस्ती करायची”.