राष्ट्रवादीच्या तोंडाला सुटले पाणी; रामटेक, गडचिरोली व अमरावतीच्या जागांवर डोळा

महाविकास आघाडीच्या प्रचंड भीतीने देवेंद्र फडणवीस आणि शिंदेंमध्ये वाद जरी झाले तरी ते मिटवून घेतील...

मुंबई  – आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्यावतीने विदर्भातील गडचिरोली, रामटेक, वर्धा आणि अमरावती या लोकसभा मतदारसंघांचा आढावा घेण्यासाठी सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची बैठक घेण्यात आली. रामटेक आणि गडचिरोलीची जागा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने लढावी असा कार्यकर्त्यांचा आग्रह आहे अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि माजी जलसंपदा मंत्री जयंत पाटील (NCP state president and former water resources minister Jayant Patil) यांनी पत्रकार परिषदेत दिली.(Activists insist that NCP should contest the seats of Ramtek and Gadchiroli).

अमरावतीची जागा ही राष्ट्रवादी काँग्रेसचीच आहे. मागच्या लोकसभा निवडणुकीत काही तांत्रिक कारणामुळे पक्षाने अपक्ष उमेदवाराला पुरस्कृत केले होते. काँग्रेस आणि राष्ट्रवादी आघाडीने त्या उमेदवाराला निवडून दिले ते आज पक्षासोबत नाही मात्र ती जागा आपणच लढावी यासाठीही तेथील कार्यकर्ते आग्रही आहेत असेही जयंत पाटील म्हणाले.

महाविकास आघाडीच्या जागा वाटपाबाबत अद्याप कोणतीही चर्चा नाही. पवारसाहेबांच्या उपस्थितीत आम्ही कार्यकर्त्यांशी संवाद साधत आहोत. ज्याठिकाणी आमची ताकद आहे त्या मतदारसंघाचा आम्ही आढावा घेत आहोत असेही जयंत पाटील यांनी सांगितले.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अज्ञात समर्थकाने काल मंगळवारी वर्तमानपत्रात जाहिराती दिल्या ज्यात फक्त मोदीजी आणि शिंदे यांचाच फोटो होता. महाराष्ट्रात शिंदे लोकप्रिय किती याची माहिती त्या जाहिरातीत देण्यात आली होती. या जाहिरातीनंतर ‘वरून डोळे वटारण्यात आले’ असेल आणि म्हणून डोळे वटारल्यानंतर आज लगेच नवी जाहिरात देण्यात आली त्यात फडणवीसांसह सर्वांचे रीतसर फोटो छापले गेले आहे असा अंदाज जयंत पाटील यांनी व्यक्त केला.

आज शेतकरी हवालदिल झाला आहे, पाऊस नसल्याने मोठे संकट त्याच्यासमोर आहे मात्र या सरकारला त्याचे काही देणेघेणे नाही. या सरकारचा फक्त जाहिरातबाजीवर भर आहे. वर्तमानपत्र व वृत्तवाहिन्यांवर सतत यांचे फोटो दाखवले जात आहेत. शिंदे गटात आणि भाजपमध्ये अंतर्गत युद्ध दिसत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जरी असले तरी त्यांना घाबरवण्याचा प्रयत्न सुरू आहे का? त्यांच्यावर काही दबाव आहे का ? म्हणून जाहिराती बदलाव्या लागत आहे अशी शंका येते. कसे वागावे याची मार्गदर्शक तत्वे कोणी तरी मुख्यमंत्र्यांना घालून देत आहे का ? असे अनेक प्रश्न जयंत पाटील यांनी उपस्थित केले.

देवेंद्र फडणवीस आणि शिंदेंमध्ये वाद जरी झाले असतील तरी ते सर्व मिटवून घेतील. कारण ही सत्ता स्थापन करत असताना दोघांनी मोठी तडजोड केली आहे. महाविकास आघाडीची त्यांना प्रचंड भीती आहे त्यामुळे ते जुळवून घेतील असा विश्वासही जयंत पाटील यांनी व्यक्त केला.

हा काही सर्व्हे करायचा वेळ नाही, मात्र सर्व्हेवर कोट्यवधी रुपये खर्च केले जात आहे. ही वेळ शेतकऱ्यांना मदत करण्याची आहे. मात्र सरकार सर्व्हे करून स्वतःची लोकप्रियता तपासण्यात व्यस्त आहे. हे सरकार ना जिल्हा परिषद निवडणुका घेत आहे ना मनपा निवडणुका घेत आहे. निवडणूक घ्या लोकं स्वतःच लोकप्रियता सांगतील असा टोलाही जयंत पाटील यांनी लगावला.