…तेरे नाल ही नचणा वे! अमृता फडणवीस यांचे नवीन गाणे लवकरच, बॅचलर्सवर आहे आधारित

Mumbai- महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या पत्नी (Devendra Fadnavis Wife) अमृता फडणवीस यांनी आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. त्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात सक्रिय असतात. राजकीय विषयांवर भाष्य करण्याबरोबरच त्या त्यांच्या गायनामुळेही चर्चेत असतात. अमृता फडणवीस (Amruta Fadnavis) यांनी आजवर बरीचशी गाणी गायली आहेत. त्यांच्या गायनाचे चाहते असणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. लवकरच अमृता फडणवीस यांचे नवीन गाणे प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. अमृता फडणवीस यांनी स्वत: सोशल मीडियाद्वारे यासंदर्भात माहिती दिली आहे.

“अज मैं मूड बणा लेया ए ए ए, तेरे नाल ही नचणा वे!!” असे या गाण्याचे बोल (Amruta Fadnavis New Song) आहेत. सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करुन या गाण्याबाबत माहिती दिली.

अमृता फडणवीस यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत माहिती दिली आहे. तसेच आपला एक फोटो देखील शेअर केला आहे. अमृता फडणवीसांच्या नव्या गाण्यातील हटके लूकची सध्या तुफान चर्चा रंगली आहे. येत्या 6 जानेवारीला ‘टी सीरिज’चं (T-Series) हे गाणं प्रदर्शित होणार आहे. नवीन गाणं हे बॅचलर्सवर आधारित असल्याचं अमृता यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे.

हटके लूकमुळे लोकांमध्ये गाण्याबद्दलची उत्सुकता आहे. जीन्स, टॉप व जॅकेट परिधान करुन ज्वेलरी घालून हटके फॅशन केल्याचं फोटोत पाहायला मिळत आहे. त्यांच्या या लूकमुळे चाहत्यांची गाण्याबद्दलची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.