‘राष्ट्रवादीच्या नेत्यांना जागोजागी चप्पलांचा हार घालतो मग चप्पला मोजायचे काम त्यांनी करावं’

मुंबई – राजकीयदृष्ट्या विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना रोखणे अवघड होत असल्याने आता राष्ट्रवादी कॉंग्रेस पातळी सोडू लागली आहे का असा सवाल आज नाविलाजाने उपस्थित करण्याची वेळ आली आहे. कारण पिंपरी चिंचवडमध्ये माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांच्या गाडीवर चप्पल भिरकावल्याचा संतापजनक प्रकार समोर आला आहे.

पिंपरी चिंचवडमध्ये विकासकामांच्या उद्घाटनासाठी देवेंद्र फडणवीस आले असताना हा प्रकार घडला आहे. अटल बिहारी वाजपेयी उद्यानात प्रवेश करताना ही धक्कादायक घटना घडली. फडणवीसांचा विरोध दर्शवण्यासाठी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजीही केली. यावेळीच फडणवीस यांच्या गाडीवर चप्पल फेकण्यात आली.

दरम्यान,  या घटनेनंतर राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले. त्यानंतर भाजपचे आमदार नितेश राणे यांनी संतप्त प्रतिक्रिया देत राष्ट्रवादीचे नेते राज्यात कसे फिरतात ते आम्ही बघू असा इशाराही दिला.   नितेश राणे म्हणाले की, २४ तास पोलिसांना सुट्टी द्या मग बघा आम्ही कुठे कुठे चप्पल घालतो असे म्हणत त्यांनी मुंबईच्या सुरक्षेच्या प्रश्नावर बोट ठेवले.TV9 मराठीने याबाबत वृत्त दिले आहे.

या घटनेवर बोलताना ते म्हणाले की, देवेंद्र फडणवीस हे आमचे नेते आहेत, त्यांच्या बाबतीत राष्ट्रवादीचे कार्यकर्ते असे वागत असतील तर राष्ट्रवादीचे नेते महाराष्ट्रात कसे फिरतात ते आम्ही बघतो. त्यांना जागोजागी चप्पलांचा हार घालतो मग चप्पला मोजायचे काम त्यांनी करावं, यानंतर भाजपचे कार्यकर्ते गप्प बसणार नाहीत असा इशाराही त्यांनी दिला.