निवडणुकीत मत द्यायचे आहे तर द्या नाहीतर नका देऊ नका, कारण…. – नितीन गडकरी

नागपूर – केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) हे आपल्या कामासाठी तसेच आपल्या रोखठोक वक्तव्यासाठी देखील ओळखले जातात. दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून गडकरी हे राजकारणातून निवृत्त होणार असल्याच्या चर्चा सुरू असताना दुसरीकडे त्यांनी पुढील निवडणुकीसाठी सज्ज असल्याचे संकेत दिले आहेत.

गडकरी यांनी म्हटले की, पुढच्या निवडणुकीत मी कटआउट लावणार नाही. कार्यकर्त्यांना चहापाणी देणार नाही आणि पोस्टरही लावणार नसल्याचे ठरवलं आहे. निवडणुकीत मत द्यायचे आहे तर द्या नाहीतर नका देऊ असे म्हटले तरीसुद्धा लोक मत देतील असे सांगताना लोकांना काम करणारी माणसं हवी आहेत असेही त्यांनी म्हटले.

मुंबईतील अंधेरी येथील ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ लोकल सेल्फ गर्व्हमेंट’च्या (All India Institute of Local Self-Government) दीक्षांत कार्यक्रमात नितीन गडकरी बोलत होते. आपल्या भाषणात त्यांनी म्हटले की, लोक ज्यांना निवडून द्यायच त्याला निवडून देतात. लोकांना चांगलं काम करणारा पाहिजे असतो. मी आयुष्यात कोणाच्या गळ्यात हार घातला नाही. माझ्या स्वागताला किंवा पोचवायला एकही माणूस येत नाही. मी स्वत: चा कटआउट लावत नाही आणि दुसऱ्याचाही कटआउट लावत नसल्याचे त्यांनी सांगितले.