नितीन राऊतांना काँग्रेसनं एससी सेलमधून हटवलं, विधानसभा अध्यक्ष होणार?

मुंबई : राज्याचं हिवाळी अधिवेशन सध्या मुंबईत सुरु आहे. या अधिवेशनात विधानसभा अध्यक्षपदाची निवड होणार आहे. खरतर मागील अधिवेशनातच विधानसभा अध्यक्षपदाचा मुद्दा निकालात काढता आला असता मात्र राष्ट्रवादी आणि शिवसेना या निवडणुकीसाठी फारसे उत्साही असल्याचे दिसून आले नाही. सोबतच कोरोनाच्या स्थितीमुळे बरेच आमदार गैरहजर होते आणि अशा परिस्थितीमध्ये निवडणूक घेतली तर काही दगाफटका होऊ शकतो अशी शंका आल्यानेच ती निवडणूक टळली.

नाना पटोले यांनी विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा देत काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी घेतली आहे. नाना पटोले यांच्या राजीनाम्यानंतर रिक्त झालेल्या विधानसभा अध्यक्षपदावर कोणाची नियुक्ती होणार, यावरून राज्याच्या राजकारणात मोठी उत्सुकता आहे. सध्या या पदासाठी काँग्रेसमधून चार नावे पुढे आली आहेत. भोरचे आमदार संग्राम थोपटे, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, अशोक चव्हाण आणि ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांची नावे अध्यक्षपदासाठी चर्चेत आहेत.

दरम्यान, नितीन राऊत (Nitin Raut) यांना काँग्रेसनं एससी सेलमधूल हटवलं आहे. एक पत्रक जारी करत त्यांना काँग्रेस एससी विभागाच्या अध्यक्षपदावरुन मुक्त करण्यात आल्याचं जाहीर करण्यात आलं आहे. नितीन राऊत यांच्या जागी राजेश लिलोठिया यांना अध्यक्ष करण्यात आलं आहे. या बदलामुळे नितीन राऊत यांच्या नावाची चर्चा ही विधानसभा अध्यक्षपदाच्या शर्यतीतही असल्याचं बोललं जातंय.