22 शेतकरी संघटना लढवणार पंजाबमधील निवडणूक; भाजपसोबत कॉंग्रेसचीही डोकेदुखी वाढणार

चंडीगड – पुढील वर्षीच्या पंजाब निवडणुकीपूर्वी शेतकरी संघटनांच्या 22 गटांनी निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची घोषणा केली आहे. शेतकरी आंदोलनादरम्यान या संघटना संयुक्त किसान मोर्चाच्या बॅनरखाली आंदोलनात सहभागी झाल्या होत्या. शेतकऱ्यांच्या मागण्या सरकारने मान्य केल्यानंतर आता हे आंदोलन स्थगित करण्यात आले असून, 22 संघटना पंजाब निवडणुकीत उतरण्याच्या तयारीत आहेत.

या शेतकरी संघटनांनी शनिवारी चंदीगड येथे पत्रकार परिषद घेऊन घोषणाही केली आहे. पंजाब विधानसभा निवडणुकीत लढण्यासाठी त्यांनी संयुक्त समाज मोर्चा स्थापन केला असून, त्या अंतर्गत या संघटना आगामी निवडणुका लढवणार असल्याची माहिती शेतकरी नेत्यांकडून देण्यात आली आहे . या शेतकरी संघटनांनी मुख्यमंत्रीपदाचा चेहरा म्हणून बलबीर सिंग राजेवाल यांचं नावही जाहीर केलं आहे. शेतकरी संघटना निवडणुकीत उतरल्याने त्याचा फटका काँग्रेसलाच बसणार असल्याचं सांगितलं जात आहे. सोबतच भाजपचे देखील काही प्रमाणात नुकसान होऊ शकेल असा अंदाज आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, बीकेयू (डकोंडा) आणि बीकेयू (लखोवाल) या तीन संघटना लवकरच या पक्षात सहभागी व्हायचे की नाही याचा निर्णय घेतील. नवीन पक्ष सर्व 117 जागांवर निवडणूक लढवणार आहेत. शेतकरी नेत्यांनीही शनिवारी याला दुजोरा दिला आहे.

राजेवाल म्हणाले की, तीन वादग्रस्त कृषी कायदे मागे घेतल्यानंतर, पंजाबच्या जनतेकडून निवडणूक लढवण्यासाठी त्यांच्यावर प्रचंड दबाव होता. अमली पदार्थ, बेरोजगारी आणि राज्यातून तरुणांचे पलायन अशा अनेक समस्या पंजाबला भेडसावत आहेत. ते म्हणाले – आम्हाला व्यवस्था बदलण्याची गरज आहे आणि आम्ही जनतेला या मोर्चाला पाठिंबा देण्याचे आवाहन करतो.

यापूर्वी, एसकेएमच्या कोअर कमिटीचे सदस्य गुरनाम सिंग चदुनी यांनीही संयुक्त संघर्ष पार्टीची राजकीय संघटना स्थापन करण्याची घोषणा केली आहे. मात्र, एसकेएमशी संलग्न असलेल्या अनेक शेतकरी संघटनांनी निवडणुकीपासून दूर राहण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये कीर्ती किसान संघ, क्रांतीकारी किसान संघ, बीकेयू-क्रांतीकारी, दोआबा संघर्ष समिती, बीकेयू-सिद्धुपूर, किसान संघर्ष समिती आणि जय किसान आंदोलन हे निवडणूक रिंगणात उतरण्याच्या विरोधात आहेत.