विधानसभा अध्यक्षपदासाठी काँग्रेसकडून संग्राम थोपटे यांच्यासह आणखी तीन बड्या नेत्यांची नावे चर्चेत

मुंबई : राज्याचं हिवाळी अधिवेशन सध्या मुंबईत सुरु आहे. या अधिवेशनात विधानसभा अध्यक्षपदाची निवड होणार आहे. खरतर मागील अधिवेशनातच विधानसभा अध्यक्षपदाचा मुद्दा निकालात काढता आला असता मात्र राष्ट्रवादी आणि शिवसेना या निवडणुकीसाठी फारसे उत्साही असल्याचे दिसून आले नाही. सोबतच कोरोनाच्या स्थितीमुळे बरेच आमदार गैरहजर होते आणि अशा परिस्थितीमध्ये निवडणूक घेतली तर काही दगाफटका होऊ शकतो अशी शंका आल्यानेच ती निवडणूक टळली.

नाना पटोले यांनी विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा देत काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी घेतली आहे. नाना पटोले यांच्या राजीनाम्यानंतर रिक्त झालेल्या विधानसभा अध्यक्षपदावर कोणाची नियुक्ती होणार, यावरून राज्याच्या राजकारणात मोठी उत्सुकता आहे. सध्या या पदासाठी काँग्रेसमधून चार नावे पुढे आली आहेत. भोरचे आमदार संग्राम थोपटे, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, अशोक चव्हाण आणि ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांची नावे अध्यक्षपदासाठी चर्चेत आहेत. यातही संग्राम थोपटे आणि पृथ्वीराज चव्हाण यांच्या नावाची जास्त चर्चा आहे.

पृथ्वीराज चव्हाण यांच्या नावाला राष्ट्रवादीतून नापसंती आहे. तर अशोक चव्हाण या पदासाठी इच्छुक नसल्याचं समजतं. नितीन राऊत यांनाही ऊर्जा खातं सोडायचं नसल्याने अखेर संग्राम थोपटे यांच्या नावावर पक्षातून शिक्कामोर्तब करण्यात आल्याचं सूत्रांनी सांगितलं. त्यामुळे येत्या 27 डिसेंबर रोजी थोपटे अर्ज भरणार असल्याचं सांगितलं जात आहे.