औरंगजेबाच्या कबरीसमोर गुडघे टेकणाऱ्यांसोबत आघाडी कशी होऊ शकते? – संजय राऊत 

मुंबई  – गेल्या अडीच वर्षापासून राज्यात महाविकास आघाडीचं सरकार आहे. तीन पक्षांच्या सरकारवर सातत्याने भाजपाकडून टीका केली जात असताना सरकार पडण्याचे मुहूर्त देखील वारंवार दिले जात आहेत. या पार्श्वभूमीवर राज्यात नवी सत्तासमीकरणं जुळण्याची चर्चा सुरू झाली असून आगामी महापालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर औरंगाबादमधून एक मोठी बातमी हाती आली आहे.

औरंगाबादमध्ये एमआयएमचे (MIM) खासदार इम्तियाज जलील (Imtiaz Jaleel) यांनी महाविकास आघाडीसोबत (Mahavikas Aghadi) जाण्याची तयारी दर्शवली आहे. भाजपला हरवण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस आणि एवढंच काय तर शिवसेनेसोबतची जाण्यास आम्ही तयार आहोत, असं वक्तव्य त्यांनी केलंय. एमआयएममुळे प्रत्येक निवडणुकीत मतांचे विभाजन होते आणि भाजपाचा विजय होतो, असा आरोप अनेकदा केला जातो. हा आरोप भविष्यात एमआयएमवर केला जाऊ नये, यासाठी आम्ही महाविकास आघाडीसोबत निवडणूक लढवण्याचा प्रस्ताव दिला आहे, अशी माहिती खासदार इम्तियाज जलील यांनी दिली आहे. भाजपाला दूर ठेवणं आणि देशातून भाजप नष्ट करणं, या समान उद्दिष्टासाठी हा प्रस्ताव असल्याचं खासदारांनी सांगितलं.

दरम्यान, या सर्व घडामोडींवरूनआता  शिवसेनेला सोशल मिडीयावर ट्रोल केले जाऊ लागले आहे. या पार्श्वभूमीवर खासदार संजय राऊत यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे.  औरंगजेबाच्या कबरीपुढे नतमस्तक होणारे कोणीही असतील ते महाराष्ट्राचे शिवसेनेचे (Shivsena) आणि महाराष्ट्रातील कोणत्याही राजकीय पक्षाचे आदर्श होऊ शकत नाही. त्यांच्याबरोबर कोणत्याही प्रकारची उघड किंवा छुपी आघाडी होऊ शकत नाही. ज्यांची छुपी युती आहे ती त्यांना लखलाभ असो, असं सांगतानाच औरंगजेबाच्या कबरीसमोर गुडघे टेकणाऱ्यांसोबत आघाडी कशी होऊ शकते? तुम्ही विचारच कसा करू शकता? असा विचार करणंच एक आजार आहे, असं राऊत यांनी सांगितलं.

शिवसेना हा शिवाजी महाराजांच्या विचारानं चालणारा पक्ष आहे. शिवाजी महाराज, संभाजी महाराज आमचे आदर्श आहेत. एखाद्या पक्षाचे नेते औरंगजेबाच्या कबरीपुढे गुडघे टेकतात आणि औरंगजेब त्यांचा आदर्श असतो. ते महाराष्ट्राचे आदर्श होऊच शकत नाहीत. ते शिवसेनेचे आदर्श होऊच शकत नाहीत. त्यामुळे एमआयएम आघाडीत येणार या अफवा आहेत. एमआयएम आणि भाजपची छुपी युती आहे. हे तुम्ही बंगाल आणि उत्तर प्रदेशातही पाहिलं आहे. जे आधीच भाजपसोबत छुप्या युतीत काम करत आहेत. त्यांच्याबरोबर महाविकास आघाडीचा कुठलाच संबंध येत नाही, असं संजय राऊत म्हणाले.