Most Runs In ODI: वनडे विश्वचषकात गोलंदाजाची पिसे काढतात ‘हे’ फलंदाज, खोऱ्याने ओढतात धावा

५ ऑक्टोबरपासून सुरू होणाऱ्या एकदिवसीय विश्वचषकासाठी (ODI World Cup 2023) सर्व संघांनी तयारी सुरू केली आहे. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर न्यूझीलंड आणि इंग्लंड यांच्यात पहिला सामना होणार आहे. या विश्वचषकात त्या खेळाडूंवरही लक्ष ठेवले जाणार आहे, ज्यांनी मागील विश्वचषकात खूप धावा केल्या होत्या. या विश्वचषकात रोहित शर्मा, विराट कोहली, डेव्हिड वॉर्नर, बाबर आझम, जो रूट आणि जॉनी बेअरस्टो हे खेळाडू आहेत ज्यांच्यावर सर्वांची नजर असणार आहे. त्यांनी गेल्या विश्वचषकातही धावा केल्या आणि पुन्हा एकदा आपापल्या संघासाठी योगदान देण्यास तयार आहेत. हा विश्वचषक सर्वात आव्हानात्मक आणि रोमांचक असणार आहे, असेही अनेक दिग्गजांचे मत आहे. चला जाणून घेऊया गेल्या विश्वचषकात कोणत्या फलंदाजांनी सर्वाधिक धावा (Most Runs In ODI World) केल्या.

भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) गेल्या विश्वचषकात विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली खेळला होता. रोहित शर्माने जे केले ते जगातील कोणताही फलंदाज कोणत्याही विश्वचषकाच्या एका आवृत्तीत करू शकला नाही. रोहित शर्माने 9 सामन्यात 5 शतके आणि एक अर्धशतकाच्या मदतीने 648 धावा केल्या. 2019 च्या वर्ल्ड कपमध्ये त्याने 67 चौकार आणि 14 षटकार मारले होते. भारताकडून सर्वाधिक धावा करणारा विराट कोहली दुसऱ्या क्रमांकावर होता. विराटने 9 सामन्यात 443 धावा केल्या होत्या. कोहलीने ५ अर्धशतके झळकावली होती. केएल राहुलने 361 आणि एमएस धोनीने 273 धावा केल्या.

ऑस्ट्रेलियाच्या डेव्हिड वॉर्नरने (David Warner) 10 सामन्यात 647 धावा केल्या, वॉर्नरने तीन शतके आणि तीन अर्धशतके केली. यादरम्यान, तो गेल्या विश्वचषकात 166 धावांची सर्वात मोठी खेळी खेळणारा फलंदाज होता. ऑस्ट्रेलियाचा तत्कालीन कर्णधार अॅरॉन फिंचने क्रिकेटमधून निवृत्ती घेतली असली तरी 2 शतके आणि तीन अर्धशतकांच्या मदतीने 507 धावा केल्या. स्टीव्ह स्मिथने 379 आणि अॅलेक्स कॅरीने 375 धावा केल्या.

बांगलादेशच्या शाकिब अल हसनने (Shakib Al Hasan) केवळ 8 सामन्यात 606 धावा केल्या होत्या. यावेळी तो संघाचा कर्णधार असेल आणि त्याच्या नेतृत्वाखाली बांगलादेश क्रिकेटला नव्या उंचीवर नेण्याचा प्रयत्न करेल. शाकिबने 2 शतके आणि 5 अर्धशतकांची खेळी खेळली होती. न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यमसनने संघाला फायनलमध्ये नेले आणि स्वतः 10 सामन्यात 578 धावा केल्या. त्याने 2 शतके आणि 2 अर्धशतके केली होती.

इंग्लंडकडून जो रूटने (Joe Root) सर्वाधिक धावा केल्या. 2019 च्या विश्वचषकात रूटने 556 धावा केल्या होत्या. त्याने दोन शतकांसह 3 अर्धशतकेही झळकावली. इंग्लंडकडून सर्वाधिक धावा करणारा जॉनी बेअरस्टो दुसरा ठरला. बेअरस्टोने 532 धावा केल्या. त्याने 11 डावात दोन शतके आणि दोन अर्धशतकेही झळकावली. बेन स्टोक्सने 465 आणि जेसन रॉयने 443 धावा केल्या. याशिवाय पाकिस्तानच्या बाबर आझमने 8 सामन्यात 474 धावा केल्या होत्या.