प्रकाश आंबेडकर हे रिपब्लिकन नाहीत, त्यांच्यासोबत कोणतीही चर्चा नाही; प्रा. जोगेंद्र कवाडे यांचं वक्तव्य

कल्याण: आगामी निवडणुका डोळ्यासमोर ठेवून सर्वच पक्षांनी तयारी सुरु केली आहे. यातच आता रिपब्लिकन ऐक्याच्या देखील पुन्हा एकदा चर्चा सुरु झाल्या आहेत. मात्र याच मुद्द्यावरून पीआरपीचे नेते जोगेंद्र कवाडे यांनी प्रकाश आंबेडकर यांच्यावर टीका केली आहे. प्रकाश आंबेडकर हे रिपब्लिकन नाहीत. त्यामुळे त्यांच्यासोबत ऐक्याची चर्चा होऊ शकत नाही, असं प्रा. जोगेंद्र कवाडे यांनी म्हटलं आहे.

कल्याणच्या शासकीय निवासस्थान येथे सम्राट या सिनेमाच्या मुहूर्तासाठी प्रा. जोगेंद्र कवाडे आले होते. यावेळी त्यांनी मीडियाशी संवाद साधला असता हे विधान केलं. जोगेंद्र कवाडे हे एका मराठी चित्रपटाच्या मूहुर्तानिमित्त कल्याणमध्ये आले होते. यावेळी त्यांनी ओबीसी आरक्षण, मुस्लीम आरक्षण आणि सध्याच्या राजकारणावर भाष्य केलंय. इतकेच नाही तर येणाऱ्या स्थानिक स्वराज्य निवडणूकीच्या तोंडावर सर्व रिपब्लीकन पक्षांना एकत्रीत आणून निवडणूका लढण्याचा विचार सुरु असल्याचही त्यांनी म्हटलं.

यानंतर वंचितचे नेते प्रकाश आंबेडकरांसोबत चर्चा सुरु आहे की नाही? असा सवाल कवाडे यांना विचारला असता, प्रकाश आंबेडेकर हे स्वत:ला रिपब्लिकन मानत नाहीत. त्यामुळे त्यांच्यासोबत रिपब्लिकन ऐक्याची चर्चा होऊ शकत नाही. रामदास आठवले यांच्यासह राज्यस्तरीय नेत्यांसोबत आमची ऐक्याची चर्चा सुरू आहे, असं कवाडे यांनी स्पष्ट केलं.