ओडिसात मोठी दुर्घटना, मालगाडी रुळावरून घसरली; ३ जणांचा चेंगरून दुर्देवी मृत्यू

ओडिसा: हल्ली अपघाताच्या बातम्यांची संख्या वाढताना दिसत आहे. नुकताच पुण्यातील नवले ब्रिजवर भीषण अपघात झाला असून यात ५० पेक्षा अधिक लोक जखमी झाले आहेत. या अपघाताच्या चर्चा सुरू असतानाच ओडिशामध्ये सोमवारी सकाळी एक मोठी दुर्घटना घडली. येथे जाजपूर जिल्ह्यातील कोरेई स्थानकावर मालगाडीने प्रवासी वेटिंग रूममध्ये धडक दिली. या दुर्घटनेत तीन जणांचा मालगाडीखाली चेंगरून मृत्यू झाला आहे. तर अन्य सात जण जखमी असल्याचे सांगण्यात येत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, ईस्ट कोस्ट रेल्वे अंतर्गत कोराई स्टेशनवर सोमवारी पहाटे एक मालगाडी रुळावरून घसरली. मालगाडीच्या वॅगन्स फलाटावर बांधलेल्या वेटिंग हॉलमध्ये पोहोचल्या. यादरम्यान दोन प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला. काही अहवालांमध्ये मृतांचा आकडा तीन आहे.

रेल्वे विभागाने दिलेल्या माहितीनुसार, अपघातामुळे दोन रेल्वे मार्ग ब्लॉक झाले आहेत. स्टेशनच्या इमारतीचेही नुकसान झाले आहे. मदत पथके, रेल्वे अधिकारी घटनास्थळी पोहोचले असून बचावकार्य सुरू आहे.

ईस्ट कोस्ट रेल्वे (ECoR) च्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, हा अपघात सकाळी 7.45 च्या सुमारास झाला. प्लॅटफॉर्मवर लोक पॅसेंजर ट्रेनची वाट पाहत होते. त्यावेळी डांगवापोसीहून छत्रपूरकडे जाणारी मालगाडी रुळावरून घसरली. त्याचे आठ डबे प्लॅटफॉर्म आणि वेटिंग रूमला येऊन धडकले.

सूत्रांनुसार, जीव गमावणाऱ्यांची संख्या वाढू शकते, अशी भीती दर्शवली जात आहे. काही जण गंभीर जखमी झाले आहेत. या अपघातात स्थानक परिसराचेही मोठे नुकसान झाले आहे. मालगाडी रुळावरून घसरण्याचे नेमके कारण अद्याप समजू शकलेले नाही. अपघातामुळे दोन्ही मार्गावरील वाहतूक ठप्प झाली असून रेल्वे सेवा काही प्रमाणात प्रभावित झाली आहे.