घोटाळे बाहेर येत असल्यानेच विरोधकांचा पोलखोल रथावर भ्याड हल्ला – प्रवीण दरेकर

मुंबई – मुंबईकरांच्या पैशाची लूट सत्ताधारी करत आहेत. पोलखोल अभियानाच्या माध्यमातून महानगरपालिकेतील महाविकास आघाडीचा (MahavikasAghadi Government) भ्रष्ट कारभार आणि करोडो रुपयांचे घोटाळे जनतेसमोर येत असल्यामुळे सत्ताधारी लोकांनी गुंड प्रवृत्तीच्या लोकांना हाताशी धरून ही तोडफोड केल्याचा आरोप विधान परिषदेचे विरोधीपक्ष नेते प्रवीण दरेकर यांनी केला. मात्र, अश्या भ्याड हल्ल्याना भाजपा जुमानत नाही. आता आणखीन आक्रमकपणे सत्ताधाऱ्यांचा भ्रष्टाचार आणि घोटाळे मुंबईकरांसमोर नेणार अशी तीव्र प्रतिक्रिया श्री. दरेकर यांनी दिली. चेंबूर आणि कांदिवली येथे पोलखोल अभियान प्रचार रथाची आणि स्टेजची तोडफोड समाजकंटकांकडून करण्यात आली. आगामी महानगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर मुंबईभर भाजपाकडून पोलखोल अभियान(Polkhol Campaign) राबविण्यात येत आहे. त्यासाठी पोलखोल रथ (Polkhol Chariot) मुंबईत फिरविण्यात येत आहे.

प्रवीण दरेकर (Pravin Darekar) म्हणाले,शिवसेनेचा पालिकेतील कारभार सगळ्यांनाच माहित आहे. भाजपा(BJP) या कारभाराची पोलखोल करत आहे. त्यामुळे असे हल्ले होत आहेत. कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला तर त्याला सरकारच जबाबदार राहील. आम्ही लोकशाही पद्धतीने हा विरोध करत आहोत. आंदोलन करत आहोत. तो आमचा अधिकार आहे. मात्र, अशा घटना जर घडल्या तर राज्य सरकारची जबाबदारी राहील, असे श्री. दरेकर म्हणाले. मुंबईकरांच्या घामाच्या पैशाची लूट सत्ताधाऱ्यांनी चालवली आहे. कराच्या रूपाने महानगरपालिकेला पैसे येतात व त्या जीवावर हे आपली घरे बांधत आहेत. मुंबईकरांच्या कष्टाच्या पैशाचं काय होत आहे आणि मुंबईकरांच्या पैशाची कशी लुटमार केली जाते आहे ते आपण पाहत आहोत. त्यामुळेच पोलखोल अभियानाच्या रथावर सत्ताधारी लोकांनी गुंड प्रवृत्तीच्या लोकांना हाताशी धरून ही दगडफेक केलेली आहे, असा आरोप श्री. दरेकर यांनी केला आहे.

अन्यथा पोलिसांना घेराव घालू

आरोपींना अटक केली नाही तर पोलिसांना घेराव घालू असा इशारा भाजपा नेत्यांनी दिला आहे. या तोडफोड प्रकरणी तक्रार करण्यासाठी भाजपा नेते हे चेंबूर पोलीस स्टेशनमध्ये (Chembur Police Station) गेले होते. आरोपीला पकडलं नाही तर पोलीस स्टेशनमध्ये ठिय्या मांडू, यावेळी कायदा सुव्यवस्था बिघडली तर यासाठी सरकार पूर्णपणे जबाबदार असेल, असा इशारा भाजपा नेत्यांनी यावेळी दिला.