ओवेसींनी तात्काळ सुरक्षा घेऊन आम्हा सर्वांच्या चिंतेला पूर्णविराम द्यावा- अमित शहा

नवी दिल्ली : एमआयएम पक्षाचे नेते आणि खासदार असादुद्दीन ओवेसी यांच्यावर झालेल्या हल्ल्यासंदर्भात आज केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी राज्यसभेत एक निवेदन सादर केले. या हल्ल्याची माहिती दिल्यानंतर त्यांनी ओवेसींना झेड दर्जाची सुरक्षा स्विकारावी अशी विनंती केली आहे. या अगोदरच ओवेसी यांनी केंद्राची सुरक्षा नाकारली आहे.

राज्यसभेत अमित शहा यांनी ओवेसी यांच्यावर झालेल्या हल्ल्यासंदर्भात निवेदन वाचले. त्यानंतर ते म्हणाले की, माझं निवेदन संपल आहे. परंतु ओवेसी यांनी आम्हाला ज्या सूचना केल्या होत्या. त्याप्रमाणे त्यांनी अजूनही केंद्राची सुरक्षा घेण्यास नकार दिला आहे. त्यामुळे मी या सभागृहाच्या माध्यमातून ओवेसी यांना विनंती करतो की, त्यांनी तात्काळ सुरक्षा घ्यावी आणि आम्हा सर्वांच्या चिंतेला पूर्णविराम द्यावा.

उत्तर प्रदेश येथील सभा आटोपून ओवेसी दिल्लीला जात असताना टोलनाक्यावर त्यांच्या गाडीवर अज्ञात व्यक्तींनी हल्ला केला होता. हा सगळा प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाल्याने देशात केंद्र सरकारवर विरोधी पक्षांनी टीका केली होती. तर ओवेसी यांच्या दीर्घायुष्यासाठी १०१ बोकडांची कुर्बानी देखील देण्यात आली आहे.

मला झेड दर्जाची नाही तर ए दर्जाचे नागरिक होण्याची इच्छा आहे. जेव्हा या देशात गरीब सुरक्षित असतील, तेव्हा मी सुरक्षित असेन. माझ्या गाडीवर हल्ला करणाऱ्यांना घाबरायची मला गरज नाही. असं म्हणत ओवेसी यांनी केंद्र सरकारची सुरक्षा नाकारली होती.