पाकिस्तानात पेट्रोल झाले स्वस्त, प्रतिलिटर थेट ४० रुपयांची कपात, भारतात कधी होणार?

Petrol Diesel Price In Pakistan: भारताचा शेजारी देश पाकिस्तानमध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या दरात 40 रुपयांपर्यंत कपात करण्यात आल्यानंतर पाकिस्तानी जनतेमध्ये आनंदाची लाट पसरली आहे. आंतरराष्ट्रीय जगतात पाकिस्तानच्या दुरावस्थेची सतत चर्चा होत असताना आणि गगनाला भिडलेल्या महागाईमुळे पाकिस्तानातील कोट्यवधी लोकांना घरोघरी पायपीट करावी लागत असताना, अन्वर-उल-हक काकर यांच्या काळजीवाहू सरकारने ती भरून काढण्याचे काम केले आहे. पाकिस्तानमध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या किमतींमध्ये आतापर्यंतची सर्वात मोठी कपात झाल्याची बातमी ट्विटरवर ट्रेंड करत आहे. मात्र या बातमीनंतर भारतात पेट्रोल आणि डिझेलच्या किमती कधी कमी होतील? हा प्रश्न उपस्थित होऊ लागला आहे.

याआधी पाकिस्तान सरकार पेट्रोलचे दर 35 रुपयांनी कमी करू शकते, असा अंदाज वर्तवला जात होता, पण इथे जनतेला मोठा आश्चर्याचा धक्का बसला आणि पेट्रोलची किंमत 40 रुपयांनी कमी झाली. त्याचबरोबर हायस्पीड डिझेलच्या दरात 15 रुपयांनी कपात करण्यात आली आहे. नवीन किमती आजपासून म्हणजेच 16 ऑक्टोबरपासून लागू झाल्या आहेत. आता पाकिस्तानातील लोक पेट्रोल 283.38 रुपये प्रति लिटर आणि हायस्पीड डिझेल 303.18 रुपये प्रति लिटर दराने खरेदी करू शकतील. 30 सप्टेंबरलाही पेट्रोल आणि डिझेलच्या दरात अनुक्रमे 8 आणि 11 रुपयांची कपात करण्यात आली होती.

भारतात महागडे पेट्रोल आणि डिझेलमुळे लोक हैराण झाले आहेत
भारतातही पेट्रोल आणि डिझेलच्या महागड्या किमतींमुळे लोक हैराण झाले आहेत आणि त्यामुळे सीएनजी आणि इलेक्ट्रिक कारची मागणी वाढत आहे. देशभरात पेट्रोल 97 रुपये आणि डिझेल 90 रुपये प्रति लिटर दराने विकले जात आहे. पुढील वर्षी भारतात लोकसभा निवडणुका होणार आहेत आणि अशा परिस्थितीत पेट्रोल आणि डिझेलच्या किमती कमी होण्याची शक्यता आहे.