प्रसिद्ध पत्रकार-लेखक तारेक फतेह यांचे निधन, बऱ्याच दिवसांपासून होते आजारी

Tarek Fatah Died- पाकिस्तानी वंशाचे प्रसिद्ध लेखक व पत्रकार तारेक फतेह यांचे निधन झाले. ते बऱ्याच दिवसांपासून आजारी होते. ते ७३ वर्षांचे होते. मुलगी नताशाने त्यांच्या मृत्यूच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे.

नताशाने ट्विट केले की, ‘पंजाबचा सिंह, भारताचा मुलगा, कॅनडाचा प्रेमी, सत्य सांगणारा, न्यायासाठी लढणारा, दलितांचा आवाज आणि अत्याचारा विरोधी तारेक फतेह आता आपल्यात नाहीत. त्यांचे कार्य आणि त्यांची क्रांती त्यांना ओळखणाऱ्या आणि प्रेम करणाऱ्या सर्वांसोबत राहतील.’ भारताबद्दलच्या उदारमतवादी वृत्तीमुळे ते इथल्या लोकांमध्ये खूप लोकप्रिय होते.

तारेक फतेह यांचे कुटुंब मुंबईचे रहिवासी होते. १९४७मध्ये भारत आणि पाकिस्तानची फाळणी झाली तेव्हा त्यांचे कुटुंब पाकिस्तानातील कराची येथे स्थायिक झाले. तारेक फतेह यांचा जन्म २० नोव्हेंबर १९४९ रोजी कराचीमध्ये झाला होता. प्रसिद्ध लेखक तारेक फतेह यांनी कराची विद्यापीठातून बायोकेमिस्ट्रीचे शिक्षण घेतले, पण नंतर त्यांनी पत्रकारितेला आपला व्यवसाय बनवले.

एका पाकिस्तानी टीव्ही चॅनलमध्ये ते काम करत होते. त्याआधी १९७० मध्ये ते कराची सन या वृत्तपत्रात वार्तांकन करायचे. शोध पत्रकारितेमुळे ते अनेकदा तुरुंगातही गेले. मात्र, तारेक नंतर पाकिस्तान सोडून सौदी अरेबियात गेले. तेथून ते १९८७ मध्ये कॅनडामध्ये स्थायिक झाले.