Pune Traffic | पुणेकर वाहतूक कोंडीने हैराण; सत्ताधारी लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष

पुणे : पुण्यात वाहतूक कोंडीचा (Pune Traffic) प्रश्न दिवसेंदिवस बिकट होत चालला आहे. मेट्रोची नियोजन शून्य कामे, ढिसाळ नियोजन यामुळे पुणेकर हैराण आहेत. विद्यापीठ चौकातील वाहतूक कोंडीमुळे (Pune Traffic) विद्यार्थी अक्षरशः रडतायत याला जबाबदार मेट्रो आणि पालिका प्रशासन आहे. त्यामुळे मेट्रो प्रशासनाला तात्काळ वठणीवर आणले पाहिजे. पालिका प्रशासनाने याबाबत काटेकोर नियोजन करावे. अन्यथा दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांचे परीक्षेचे पेपर चुकण्याचा घटना पुन्हा घडतील. त्यामुळे प्रशासनाने वेळीच जागे होऊन पुण्यातील वाहतूक कोंडीचा प्रश्न तात्काळ सोडवावा, अशी मागणी विधानसभा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार (Vijay Vadettiwar) यांनी केली आहे.

वडेट्टीवार म्हणाले, सावित्रीबाई फुले विद्यापीठ चौकातील वाहतूक कोंडी कळीचा मुद्दा आहे. पुण्यात विकासाच्या बाता मारणाऱ्या सत्ताधारी लोकप्रतिनिधींनी या प्रश्नाकडे लक्ष दिले पाहिजे. दहावी आणि बारावीचे विद्यार्थी परीक्षेला वेळेत पोहोचणार कसे? हा पुण्यातील पालकांच्यासमोर प्रश्न आहे. रिक्षा, ओला, उबेरने परीक्षेला जाणे सर्वांना परवडणारे नाही.

वडेट्टीवार म्हणाले की, शिवाजीनगर ते सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठादरम्यान (Savitribai Phule Pune University) आचार्य आनंदऋषीजी चौकात तसेच पाषाण, औंध, बाणेरकडे जाणाऱ्यांना वाहतूक कोंडीत अडकून पडावे लागते. त्यामुळे नियोजनबद्ध पायाभूत सुविधा निर्माण कराव्यात. महापालिका प्रशासन नागरिकांकडून कोट्यवधींचा कर वसूल करते, मग चांगले रस्ते, पायाभूत सुविधा उपलब्ध करून का देत नाही? असा प्रश्न पुणेकर विचारत आहेत.

वाहतूक कोंडीत पुण्याचा जगात सातवा क्रमांक आहे. टॉम टॉम या आंतरराष्ट्रीय संस्थेने केलेल्या अभ्यासातून ही माहिती समोर आली आहे. वाहतूक पोलिसांची अपुरी संख्या, शहरात सुरू असलेली नियोजनशून्य विकास कामे, ही वाहतूक कोंडीची प्रमुख कारणे आहेत. पण पुण्यातील सत्ताधारी व्हिआयपींच्या गाड्यांना वेगळा मार्ग आरक्षित असल्याने त्यांना जनतेचा त्रास दिसत नाही ही वस्तुस्थिती आहे.

महत्वाच्या बातम्या : 

Ajit Pawar | ‘आयत्या बिळावर नागोबा’ असणारे हे लोक दुसऱ्याचा पक्ष फोडणारे ‘गद्दार’ आहेत

Supriya Sule | मराठा, धनगर, मुस्लिम आरक्षणाच्या प्रश्नावर संसदेत सुप्रिया सुळे यांनी वेधले लक्ष

Ajit Pawar | पक्षाची भूमिका पुढे वृध्दींगत करण्यासाठी आम्ही कालही कटीबद्ध होतो… आजही आहोत आणि भविष्यातही राहू